मोहित सोमण: कॅबिनेट बैठकीत एजीआर (Adjusted Gross Revenue) बाबत दिलासा दिल्याचा निर्णय घेतल्यानंतर त्वरित वोडाफोन आयडिया कंपनीच्या प्रवर्तकांनी भांडवली गुंतवणूकीची घोषणा एक्सचेंज फायलिंगमध्ये केल्याने संपूर्ण महिनाभर तेजीत असलेला शेअर आज ८% पातळीवर उसळला आहे. दिवसभरात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत असताना दुपारी १२.०२ वाजेपर्यंत शेअर ७.८१% उसळत ११.६० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८७६९५ कोटींच्या एजीआर थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर लगेचच वीआय (VI) कंपन्यांच्या प्रवर्तकांनी ३५२९ कोटींची नवी भांडवली गुंतवणूक कंपनीत करण्याची गुंतवणूक घोषित केल्याने शेअर आणखी उसळला होता.
वोडाफोन आयडिया कंपनीच्या विलिनीकरणानंतर तत्पूर्वी म्हणजेच २०१८ पूर्वी असलेली थकबाकी व त्यावरुन असलेला वाद यासाठी न्यायालयाचे दरवाजे कंपनीने ठोठावत या एजीआर माफ करण्याची मागणी न्यायालयात केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर सरकारने काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.
तत्पूर्वी या वर्षीच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दूरसंचार ऑपरेटरच्या वैधानिक देयकांची पुनर्तपासणी करण्याची परवानगी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. सुधारित आराखड्यानुसार, ३१ डिसेंबरपर्यंत गोठवलेली एजीआर (AGR) देयके आर्थिक वर्ष ३२ ते ४१ दरम्यान परत केली जाणार आहेत तर आर्थिक वर्ष १८ आणि १९ ची देयके आर्थिक वर्ष २६ ते ३१ दरम्यान कोणत्याही बदलांशिवाय दिली जात राहतील अशी माहिती मिळत आहे. गोठवलेल्या एजीआर रकमेची दूरसंचार विभागाकडून पुनर्तपासणी केली जाईल ज्याचा निकाल सरकार-नियुक्त समितीद्वारे निश्चित केला जाईल आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक मानला नव्या नियमानुसार मानला जाणार आहे.
आज दिलेल्या वोडाफोन आयडियाने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, त्यांनी ३१ डिसेंबर, २०२५ रोजी आपल्या प्रवर्तक आणि प्रवर्तक गट भागधारकांसोबत एक सुधारणा करार केला आहे, जो मूळ अंमलबजावणी आराखड्यांतर्गत केलेल्या पूर्वीच्या वचनबद्धतांची पुष्टी करतो. कंपनीने हे देखील स्पष्ट केले की, संभाव्य दायित्व समायोजन (Debt Adjustement Mechanism) यंत्रणेचा काही भाग व्होडाफोन समूहाच्या काही भागधारकांकडून पाच वर्षांच्या कालावधीसाठी ३२८ कोटी इक्विटी शेअर्स गहाण ठेवून सुरक्षित करण्यात आला आहे असे कंपनीने म्हटले.
कंपनीच्या माहितीनुसार, २०१८ च्या व्होडाफोन इंडिया-आयडिया विलीनीकरणादरम्यान, तत्कालीन प्रवर्तकांनी ३१ मे, २०१८ पूर्वी उद्भवलेल्या विवादांशी संबंधित रोख प्रवाहाच्या (Cash Flow) जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास सहमती दर्शविली होती. कंपनी आपली आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याने ही नवीन निधी व्यवस्था त्या वचनबद्धतांवर आधारित आहे असे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले.
आता कंपनी करणार असलेल्या नव्या ५८३६ कोटी गुंतवणूकीपैकी २३०७ कोटी रूपयांची रोख रक्कम संपूर्ण आर्थिक वर्षात गुंतवली जाणार आहे तर उर्वरित ३५२९ कोटींची रक्कम ही इक्विटी शेअर विक्रीतून उभारली जाणार आहे. कंपनी यापूर्वी आर्थिक संकटातून जात असताना रिस्ट्रक्चर योजनेचा भाग म्हणून सरकारने या कंपनीत आपला भागभांडवल (Stake) हिस्सा ४८.९९% पर्यंत वाढवला होता. आदित्य बिर्ला समुह व वोडाफोन पीएलसी यांचे नियंत्रण कंपनीवर कायम राहण्याचेही सरकारने त्यावेळी स्पष्ट केले होते.
या दोन्ही घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ झाली आहे. आज ८% इंट्राडे उच्चांकावर वाढ झाल्यासह हा शेअर गेल्या ५ दिवसात ४.७३% घसरला असला तरी गेल्या एक महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये १५.६१% वाढ झाली आहे. तर गेल्या सहा महिन्याच्या आधारावर शेअर ५३.५६% उसळला असून इयर टू डेट बेसिसवर शेअर ४२.८२% उसळला आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १.२४ लाख कोटी रुपये असून सबस्क्राईबर बाबतीत देशातील क्रमांक ३ ची कंपनी म्हणून ओळखली जाते. सध्या कंपनीकडे २० कोटीहून अधिक सबस्क्राईबर आहेत.






