मुंबई : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आदी अॅपबेस्ड फूड ऑर्डर पूर्ण करणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे थर्टी फर्स्टच्या घरगुती पार्ट्या संकटात सापडल्या आहेत. फूड आणि क्विक कॉमर्स सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वर्षातील सर्वात व्यस्त दिवशी डिलिव्हरी सेवा विस्कळीत होऊ शकतात, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.
फक्त १० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमुळे सुरक्षिततेचा धोका वाढत असल्याचा आरोप करत गिग वर्कर्सनी संप पुकारला आहे. इंडियन फेडरेशन ऑफ अॅप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने सरकारकडे किमान मासिक उत्पन्न, विमा संरक्षण, कामाचे तास मर्यादित करणे आणि कामगार म्हणून कायदेशीर मान्यता अशा मागण्या केल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी डिलिव्हरी पार्टनर्सनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे २५ डिसेंबर रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये परिणाम दिसून आले. आता ३१ डिसेंबरलाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, संपाचा परिणाम कमी करण्यासाठी झोमॅटो आणि स्विगीने डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठ्या प्रमाणात इंसेंटिव जाहीर केली आहेत. झोमॅटोने पीक अवर्समध्ये प्रति ऑर्डर जादा मानधन आणि पेनल्टी माफीची घोषणा केली आहे. स्विगीने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीदरम्यान मेगा कमाई ऑफर देत पीक अवर्समध्ये अतिरिक्त बोनस देण्याचे आश्वासन दिले आहे. झेप्टोनेही पेमेंट स्ट्रक्चरमध्ये बदल करत डिलिव्हरी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.