मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असताना शिवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडाळ्यातील शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत गॅस सिलेंडरचे एकामागून एक चार भीषण स्फोट झाले. या दुर्घटनेत ५ ते ६ घरांचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण चाळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
बंद घरात लागली आग
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास गुरुकृपा चाळीतील एका बंद घरात शॉर्टसर्किट झाले. घराला कुलूप असल्याने सुरुवातीला आगीची ठिणगी कोणाच्या लक्षात आली नाही. काही वेळातच आगीने घरातील लाकडी साहित्य आणि कपड्यांना वेढा घातला. आगीचा भडका उडताच घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांना क्षणभर भूकंप झाल्याचा भास झाला.
स्फोटांनंतर चाळीत गोंधळ
पहिल्या स्फोटानंतर आग वेगाने शेजारील घरांमध्ये पसरली. चाळीतील घरे अगदी एकमेकांना लागून असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. आगीच्या उष्णतेमुळे बाजूच्या घरांमध्ये असलेले आणखी तीन सिलेंडर एकामागून एक फुटले. या स्फोटांच्या मालिकेमुळे संपूर्ण गुरुकृपा चाळ धुराच्या लोटांनी वेढली गेली. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली आणि परिसरात पळापळ झाली.
यंत्रणा घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. खबरदारी म्हणून परिसराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. अग्निशमन दलासोबतच शिवडी पोलीस, मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि बेस्ट प्रशासनाचे पथकही मदतीसाठी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आहे.
संसार जळाले, पण जीव वाचले
या भीषण आगीत ५ ते ६ घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. घरातील फर्निचर, कपडे, कागदपत्रे आणि अन्नधान्य आगीत नष्ट झाले असून संबंधित कुटुंबे उघड्यावर आली आहेत. मात्र इतके मोठे स्फोट होऊनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही नागरिकांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.