मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक पुरुष अशा एकूण चार जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले, तसेच पोलीस आणि प्रशासनाला तातडीने आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले. अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली आहे.
बस रिव्हर्स घेताना चालकाने नियंत्रण गमावल्यामुळे अपघात झाला. या प्रकरणी पोलिसांनी बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघाताचा पोलीस तपास सुरू आहे.