ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात आणखी एका हिंदू व्यक्तीचा जीव गेला आहे.ग्रामीण निमलष्करी दल 'अन्सार'मध्ये कार्यरत असलेले बजेंद्र बिस्वास यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी त्याच दलातील सहकारी नोमान मियाँ याला अटक करण्यात आली. ही घटना भालुका उपजिल्ह्यातील मेहराबारी परिसरात असलेल्या सुलताना स्वेटर लिमिटेड या कारखान्यात घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बजेंद्र बिस्वास आणि नोमान मियाँ हे दोघे एका खोलीत बसले असताना अचानक नोमानने कोणताही वाद नसताना बजेंद्रवर बंदूक रोखली आणि गोळी झाडली. गोळी त्यांच्या डाव्या मांडीला लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बजेंद्र बिस्वास हे सिल्हेट सदर उपजिल्ह्यातील कादिरपूर गावचे रहिवासी होते. ते अन्सार दलात कार्यरत होते आणि कारखान्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आरोपी नोमान मियाँ हा सुनामगंज जिल्ह्यातील ताहिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. लबीब ग्रुपसाठी नियुक्त अन्सारचे प्रभारी अधिकारी एपीसी मोहम्मद अझहर अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कोणताही वाद किंवा भांडण सुरू नव्हते. अचानक घडलेल्या या गोळीबाराने सर्वजण हादरून गेले. सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बजेंद्र आणि नोमान यांच्यात यापूर्वी कोणतेही वैमनस्य नव्हते.