मुंबई : उबाठा गट, संजय राऊत यांच्यापाठोपाठ मनसे कडूनही हिरव्या मतांसाठी लांगुलचालन चालू झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत या उबाठा - मनसेच्या तथाकथित आघाडीचे बारा वाजणार अशी बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. जे स्वत: राहुल गांधी यांचे तळवे चाटतात, सोनिया गांधी यांची गुलामी करतात ते आज शिवसेनेवर बूट चाटण्याची टीका करतात हे हास्यास्पद आहे. दुस-यांवर टीका करण्याआधी जरा आरशात पहा असा खोचक सल्लाही त्यांनी संजय राऊतांना दिला.
थैलीचे राजकारण कोण करते हे जनतेला माहीत आहे. संजय राऊत हेच अशा राजकारणात दंग असतात. थैल्या भरणाऱ्या आणि तिजोरी भरणाऱ्यांचा हिशोब जनतेला उत्तमपणे माहिती आहे. पत्राचाळ घोटाळ्यासह इतर घोटाळ्यांचा हिशोब द्या असे आव्हान बन यांनी दिले. सच्च्या कार्यकर्त्याला डावलून उमेदवारी न देता भावाला उमेदवारी देऊन घराणेशाहीचे राजकारण राऊत करतात असे शरसंधानही त्यांनी केले. उद्धव ठाकरे आता पहाटे चारपर्यंत जागून काही जनतेवर उपकार करत नाही आहेत. मुख्यमंत्री होते तेव्हा झोपा काढत होते आणि फेसबुक लाइव्ह करण्यात धन्यता मानत होते असा प्रहार बन यांनी केला.
भाजपा गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही
नवाब मलिक मुंबई महापालिका निवडणुकीत नेतृत्व करणार असतील भाजपा साथ देणार नाही हे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे याचा पुनरुच्चार करत बन म्हणाले की, कोणत्याही गुन्हेगाराच्या पाठीशी भाजपा उभी राहत नाही. मुंबईचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करू शकतात आणि जनतेचा पाठिंबाही भाजपा- शिंदे शिवसेनेला मिळणार आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान राखणारी भाजपा
भाजपामध्ये एका विशिष्ट घराण्यात जन्माला आले तरच उमेदवारी किंवा संधी मिळते असे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उचित संधी नेहमी दिली जाते. “माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मानखुर्द प्रभाग क्रमांक 135 ची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपाचे मनापासून आभार” या शब्दांत बन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मानखुर्दची जनता भाजपाच्या विकासाच्या राजकारणाच्या बाजूने उभी राहील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.