खोपोली : मंगेश काळोखे यांची हत्या करून आरोपी मोबाइल बंद ठेवून अंडरग्राउंड झाल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने आरोपी शोधण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान होते. जिल्हा पोलीस अधिक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलिसांची पथके तयार करून मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर यांची पत्नी उर्मिला देवकर, दोन मुले दर्शन व धनेश तसेच मेव्हण्यासह यांच्यासह चार संशोयित पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींना खालापूर न्यायालयात हजर केले असता ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाचे मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांच्या विरोधात खोपोली नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मानसी काळोखे यांनी उर्मिला देवकर यांचा पराभव केला होता. फिर्यादी राज काळोखे यांचे चुलते तथा मयत मंगेश काळोखे ऊर्फ आप्पा साईबाबानगर येथून येत असताना दर्शन देवकर, सचिन चव्हाण व इतर ३ इसम यांनी अगोदर काळोखे यांचा पाठलाग करून त्यांच्यावर वार करून जिवे ठार मारले आणि घटनास्थळावरून फरार झाले.
हा गुन्हा सामाजिक व राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील स्वरुपाचा असल्याने खोपोली शहरात जनक्षोभ उसळला आणि गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी दिवसभर लावून धरली होती. पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल पाटील यांनी जनसमुदायातील लोकांना व नातेवाइकांना फरार आरोपीचा शोध घेण्याचे ठाम आश्वासन दिले होते, त्यानंतर शोध घेण्यासाठी पाच पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती. पथकाने तपास कौशल्याचा वापर करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपासाची चक्रे फिरवून, गुन्ह्याचा अत्यंत कौशल्याने तपास करून फरार आरोपी रवींद्र, दर्शन, धनेश, उर्मीला, विशाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे आणि दिलीप पवार यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांना यश आले. खोपोली पोलीस ठाण्यात गु.रजि.नं., कायदा व कलम ३६६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ६१(२),१८९(१), १८९(४), १९० १९१(३) सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम दाखल करण्यात आले.