नवे वर्षं सुरू होत असताना अर्थनगरीमध्ये देशाच्या आर्थिक कामगिरीचा ताळेबंद मांडला जात आहे. त्यात गुंतवणूकक्षेत्राची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. त्यानुसार रिअल इस्टेट क्षेत्राचे खास चित्र समोर येत असून येत्या काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला पडताळा करून पाहताना सरत्या वर्षामध्ये शेअर बाजारापेक्षा सोन्या-चांदीतील गुंतवणूक फायदेशीर ठरल्याचे दिसून येत आहे.
वर्षं संपत असताना अर्थनगरीमध्ये विविध क्षेत्रांच्या कामगिरीचा ताळेबंद मांडला जात आहे. त्यात गुंतवणूकक्षेत्राची मोठी चर्चा पहायला मिळत आहे. त्यानुसार रिअल इस्टेट क्षेत्राचे खास चित्र समोर येत असून येत्या काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला पडताळा करून पाहताना सरत्या वर्षामध्ये शेअर बाजारापेक्षा सोन्या-चांदीतील गुंतवणूक फायदेशीर ठरल्याचे दिसून येत आहे.
रिअल इस्टेट मार्केटमधील अलीकडील निदर्शक सूचित करतात की खरेदीसाठी अधिक प्रतीक्षा करणे नव्या ग्राहकांना खूप महाग ठरू शकते. आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सचा विश्वास आहे की २०२६ मध्ये घरांच्या किमती स्थिर राहणार नाहीत, तर लक्षणीयरीत्या वाढतील. ‘क्रेडाई’ आणि ‘सीआरई मॅट्रिक्स’च्या अलीकडील अहवालामुळे घर खरेदीदारांच्या चिंता वाढल्या आहेत. या अहवालानुसार, बाजारात मंदीची अपेक्षा करणे सध्या व्यर्थ आहे. कारण बहुतेक विकासकांना किमती वाढण्याची खात्री आहे. या सर्वेक्षणातील आकडेवारी ‘रिअल इस्टेट’ क्षेत्राची मानसिकता काय आहे हे स्पष्ट करते. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सुमारे ६४७ सहभागींमध्ये केलेल्या या सर्वेक्षणातून एक स्पष्ट चित्र समोर येते. ६८ टक्के विकासकांनी असे म्हटले आहे, की २०२६ मध्ये घरांच्या किमती पाच टक्क्यांहून अधिक वाढतील; पण हे चिंतेचे एकमेव कारण नाही. आकडेवारीचा सखोल अभ्यास केल्यास दिसून येते, की एक टक्का विकासकांना वाटते, की ही वाढ २५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते. दरम्यान, १८टक्के प्रतिसादकांना वाटते, की किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढतील. सवलतीची आशा बाळगणाऱ्यांसाठी हा धक्का असू शकतो. कारण फक्त आठ टक्के विकासकांना किमती कमी होतील, असे वाटते. याचा अर्थ असा, की परवडणारी घरे मिळण्याची शक्यता कमी आहे.
मालमत्तेच्या किमती गुंतवणूकदारांमुळे किंवा सट्टेबाजीमुळे वाढतात, असे अनेकदा मानले जाते; परंतु या वेळी परिस्थिती वेगळी आहे. विकासकांच्या मतानुसार बाजारात दिसणारी मागणी ही अशा लोकांकडून आहे, ज्यांना खरोखर आपल्या घरात राहायचे आहे. याला ‘एंड-यूजर’ मागणी म्हणतात. अहवाल दर्शवतात, की जवळजवळ दोन-तृतीयांश विकासकांना येत्या वर्षात घरांची मागणी पाच टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. खऱ्या खरेदीदारांकडून मागणी येते, तेव्हा किमती कमी होण्याची शक्यता कमी असते. कारण ती कृत्रिम वाढ नसते. खरेदीदारांकडून दाखवला जाणारा हा उत्साह विकासकांच्या आत्मविश्वासाचे एक प्रमुख कारण आहे. केवळ मागणीमुळेच नव्हे, तर बांधकाम खर्च आणि प्रक्रियांमुळेदेखील किमती वाढतात.
‘क्रेडाई’चे अध्यक्ष शेखर जी. पटेल यांच्या मते, हे क्षेत्र पूर्वीपेक्षा अधिक संघटित होत आहे. विकासक कामाला गती देण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत; परंतु याचा परिणाम थेट खर्चावरही होतो. पटेल म्हणाले, की प्रकल्पांसाठी सरकारी मंजुरी लवकर मिळाल्या आणि नियम स्पष्ट असतील तर ते पुरवठा वाढवण्यास मदत करेल. त्यांचा विश्वास आहे, की सोपी मंजुरी प्रक्रिया केवळ वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याची खात्री देणार नाही, तर संतुलित शहरी विकासदेखील सुनिश्चित करेल. ‘सीआरई मॅट्रिक्स’ आणि ‘इंडेक्सटॅप’चे ‘सीईओ’ अभिषेक किरण गुप्ता यांच्या विश्लेषणातून दिसून येते, की रिअल इस्टेट क्षेत्र आता दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे. याचा सरळ अर्थ असा, की विकासक बेफिकीरीने प्रकल्प सुरू न करता शिस्तबद्ध पद्धतीने पुरवठा वाढवत आहेत. पुरवठा नियंत्रणात असतो आणि मागणी वाढते तेव्हा किमती वाढणे साहजिक असते.
दरम्यान, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांना २०२५ हे वर्ष चांगलेच फायदेशीर ठरले. सोन्याच्या दरात ७३-७५ टक्क्यांची वाढ झाली. एक जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळे ७८ हजार रुपये इतका होता. आणि आता डिसेंबर महिन्यात सोन्याचा एका तोळ्याचा दर एक लाख ३७ हजार रुपये आहे. गेल्या ४६ वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. ‘मल्टीकमॉडिटी एक्स्चेंज’वर सोने दराने एक लाख ३५ हजार ५९० रुपयांचा उच्चांक गाठला आहे. सामान्यजन गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य देत आहेत. ऑक्टोबर २०२३ नंतर सोन्याचे दर १३९ टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याप्रमाणे चांदीचे दरदेखील मोठ्या प्रमाणात वाढले.
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी २०२६ मध्ये देखील पाहायला मिळू शकते. बाजार जाणकारांच्या मते गेल्या दहा वर्षांमध्ये सोने आणि चांदी रिटर्न देण्याकामी सर्वात पुढे आहेत. ‘मेहता इक्विटीज लिमिटेड’चे उपाध्यक्ष कमॉडिटीज राहुल कलंत्री यांनी म्हटले की, दरातील तेजी आणि घसरणीनंतरही गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला असून सोन्याचे दर दोन महिन्यातील उच्चांकाजवळ आहेत. अमेरिकन ‘फेडरल रिझर्व्ह’च्या व्याजदरातील २५ बेसिस पॉइंटच्या कपातीनंतर जागतिक मार्केटमध्ये चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दरात शंभर टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. श्री. कलंत्री यांच्या मते, गुंतवणूकदारांची रणनीती संतुलित असली पाहिजे. कमी दरांवर गुंतवणूक करणाऱ्यांनी ‘कोअर अलॉकेशन’ कायम ठेवत अंशत: नफा पदरात पाडून घेण्याबाबत विचार करायला हवा. नव्या गुंतवणूकदारांनी घसरण पाहता ‘डॉलर कॉस्ट एवरेजिंग स्ट्रॅटेजी’ राबवावी. या सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या वर्षात सोन्याच्या किमतीत बरेच चढ उतार पाहायला मिळतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आता एक खास बातमी. भारतीय लष्कर ८५० आत्मघातकी ड्रोन खरेदी करण्याची तयारी करत आहे. हे ड्रोन तिन्ही संरक्षण दलांना आणि विशेष दलांना बळकट करण्यासाठी वापरले जातील. हा प्रस्ताव खरेदीच्या अंतिम टप्प्यात आहे. संरक्षण सूत्रांनी सांगितले, की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. जलदगती प्रक्रियेद्वारे अमलात आणल्या जाणाऱ्या या प्रस्तावाअंतर्गत, लष्कराला स्वदेशी बनावटीचे लाँचर्स असलेले अंदाजे ८५० लोटेरिंग ॲटॅक ड्रोन मिळतील. भारतीय लष्कर आधीच विविध स्त्रोतांकडून खरेदी केलेले असे ड्रोन मोठ्या प्रमाणात वापरते आणि भविष्यात त्यांच्या सर्व लढाऊ तुकड्यांना सुसज्ज करण्यासाठी अंदाजे ३० हजार ड्रोन समाविष्ट करण्याची योजना आखत आहे.
सैन्याच्या प्रत्येक पायदळ बटालियनमध्ये आता एक अश्विनी प्लाटून असेल. ही प्लाटून शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये वापरले जाणारे ड्रोन चालवण्यासाठी जबाबदार असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर केला. या ऑपरेशनच्या पहिल्या दिवशी भारताने नऊपैकी सात दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याविरुद्धही ड्रोनचा वापर करण्यात आला. ते ड्रोन दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी वापरले गेले. सैन्याच्या कारवाईमुळे शत्रूचे मोठे नुकसान झाले आणि सीमेवरील त्यांच्या पायाभूत सुविधांचे लक्षणीय नुकसान झाले. म्हणूनच यापुढील काळात युद्धभूमीवर ड्रोन्सचे साम्राज्य बघायला मिळणार आहे. त्या दृष्टीने देश शस्त्रसज्ज करत असताना अधिक सक्षम, आधुनिक तंत्राने सज्ज ड्रोन्ससाठी प्रत्येक देश स्वत:ला तयार ठेवू पाहत आहे. परिणामी, या बाजारपेठेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.