गृहमंत्री अमित शहा यांचा टोला
अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून जाऊ नये, कारण आगामी काळात बंगाल आणि तामिळनाडूमध्येही त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागणार आहे," अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना टोला लगावला. २०२९ मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकारच येणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अहमदाबाद महानगरपालिकेच्या ३३० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, राम मंदिर उभारणी असो किंवा पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसने प्रत्येक वेळी विरोधच केला. काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आणि मुस्लीम भगिनींसाठी तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयालाही काँग्रेसचा कडाडून विरोध होता. समान नागरी कायदा आणि बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याच्या मोहिमेतही त्यांची आडकाठी होती. जनतेला जे आवडते, त्यालाच राहुल गांधी आणि काँग्रेस विरोध करतात; मग मतं कशी मिळणार?”अशा नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना जनतेने नाकारले आहे. "लोकप्रतिनिधी त्यांच्या कामासाठी जबाबदार असतो. मग ते लोक मागत असोत किंवा नसोत. नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि देशभरातही उत्कृष्ट कार्यसंस्कृती निर्माण केली आहे. त्यामुळे २०२९ मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याने राहुल बाबांना अजून बरेच पराभव पाहायचे आहेत, 'याकडे शहा यांनी लक्ष वेधले.
मलेरिया आजारापासून देश लवकर मुक्त हाेणार
भारतातील मलेरियाच्या रुग्णसंख्येत ९७ टक्क्यांनी घट झाली असून देश लवकरच या आजारातून मुक्त होणार आहे. अहमदाबादमधील शेला येथे आयोजित भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए च्या परिषदेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, आयुष्मान भारत आणि मिशन इंद्रधनुष यांसारख्या आरोग्य योजनांमुळे मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.