मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार
▪️मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा मोठा निर्णय
▪️पहाटेपर्यंत विशेष फेऱ्यांचे नियोजन
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची 'ॲक्वालाईन' (मेट्रो-३) रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.
ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होईल. ही सेवा १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. त्यानंतर, १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. म्हणजेच, मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा.