भाषणाची भीती

कथा : रमेश तांबे 


एक होता राजा. त्याच्या राज्याचा एक नियम होता की जो कोणी चोर सापडेल त्याला भुकेलेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात सोडायचं. मग तो भुकेने कासावीस झालेला सिंह काही मिनिटांतच त्या चोराचा फडशा पाडून टाकायचा. आणि विशेष म्हणजे लोकांनी या प्रसंगी उपस्थित राहिले पाहिजे असा राजाचा आदेश होता. जेणेकरून लोक गुन्हा करताना शंभर वेळा विचार करतील. त्यामुळे आपल्या राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल असा राजाचा विश्वास होता.


काही दिवसांतच एकदम दोन चोरांना कोतवालाने पकडून राजासमोर हजर केले. राजाने आदेश दिला पंधरा दिवसांनी मोकळ्या मैदानात या दोन चोरांना सिंहाच्या पिंजऱ्यात सोडण्यात येईल. हा प्रसंग पाहण्यासाठी लोकांना बोलावण्यात आले. एका भल्यामोठ्या मैदानाच्या मध्यभागी सिंहाचा पिंजरा ठेवण्यात आला. आज सिंह या चोरांचा कसा फडशा पाडणार हे पाहण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली होती. राजादेखील आपल्या मंत्रिमंडळींसह मैदानावर हजर होता. सर्व जनता मोठ्या उत्साहात उभी होती. मग तो क्षण जवळ आला. दोन्ही चोरांना दोरखंडाने बांधून सिंहाच्या पिंजऱ्याजवळ नेण्यात आले. सर्व जनता श्वास रोखून बघू लागली.


सैनिकांनी गेले पंधरा दिवस उपाशी असलेल्या सिंहाचा पिंजरा उघडला अन् त्यांनी पहिल्या चोराला पिंजऱ्यात ढकलले. मग मोठे नवलच घडले. तो चोर न घाबरता स्वतःच सरळ सिंहाजवळ गेला अन् त्याच्या कानात त्याला काही तरी सांगितले. अन् काय आश्चर्य, त्या सिंहाने चोराला काहीच केले नाही. तो चोर सरळ पिंजऱ्याबाहेर पडला. हे दृश्य बघून जनतेने तर तोंडातच बोटे घातली. राजादेखील अगदी चक्रावून गेला. मग दुसऱ्या चोराला पिंजऱ्यात सोडण्यात आले. मग त्या चोरानेदेखील सिंहाच्या कानात काहीतरी सांगितले अन् तोही सरळ पिंजऱ्याच्या बाहेर आला. आता मात्र सर्व बघे अगदी गोंधळून गेले. हे कसे शक्य आहे. असा भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.


इकडे राजा आपल्या प्रधानाकडे, मंत्र्यांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. आता दोघेही चोर राजाच्या शेजारी उभे राहून गालातल्या गालात हसत होते. मग राजा धावतच पिंजऱ्याकडे गेला अन् सिंहाला म्हणाला, काय रे तू पंधरा दिवस उपाशी आहेस ना; मग त्यांना तू खाल्ले का नाहीस? आणि मला एक सांग त्या दोघांनी तुझ्या कानात काय सांगितले!


मग सिंह बोलू लागला, “महाराज मी गेले पंधरा दिवस उपाशी आहे हे खरं आहे. पण त्या दोघांनी माझ्या कानात सांगितले की, आम्हाला खाऊन झाले की राजा आणि त्याच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्री तुझ्यापुढे चार तास भाषणे करणार आहेत. महाराज क्षमा करा. मला भाषणे ऐकण्याचा फारच कंटाळा येतो. मग मी विचार केला की ही एवढी भाषणे ऐकण्यापेक्षा आपण उपाशी राहिलेलं बरं! आणि म्हणूनच मी त्यांना काही न करता पिंजऱ्यातून बाहेर जाऊ दिलं. सिंहाचे हे कथन ऐकून राजाने कपाळावरच हात मारला.

Comments
Add Comment

माती कशी तयार होते?

विज्ञानकथा - प्रा. देवबा पाटील शिवम आणि त्याची मित्रमंडळी सहलीवर गेले होते. ते भुका लागल्याने दुपारच्या वेळी

शिक्षा नव्हे शिक्षण

कथा - रमेश तांबे नमस्कार बाल मित्रांनो, मी आज तुम्हाला दक्षिण कोरिया या देशातल्या एका शाळेची आणि त्या शाळेत

हास्यरसातून जीवनरस

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ एकदा अचानक एका दिवाळी अंकाच्या संपादकाचा फोन आला, तुम्हाला ‘हास्य’ या विषयावर

आंतरिक व्यक्तिमत्व

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर मनुष्याचे बाह्य रूप, पोशाख, बोलण्याची शैली किंवा सामाजिक प्रतिष्ठा पाहून

बघ्यांची गर्दी नि रेंगाळणारा न्याय...

स्पंदन; अश्विनी शिंदे-भोईर उन्हाळ्यात लालभडक फुललेला गुलमोहोर. ज्याच्या सावलीत कदाचित अनेकांचं बालपण रुजलेलं

“माझं बाळ हट्टी नाही, ते मला काही तरी सांगतंय!”

आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू अभिषेक आणि समिधा दोघेही तीन वर्षांच्या निहारला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये