नगरध्यक्षपदी उबाठाचा नगराध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक
श्रीवर्धन निवडणूक चित्र
रामचंद्र घोडमोडे श्रीवर्धन : श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकीच्या चुरशीच्या निव़डणुकीत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती युतीची झाली. उबाठाचे रायगडमधील अस्तित्व संपले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच मनसेच्या पाठिंब्यावर उबाठाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चौगुले यांनी बाजी मारीत ते नगराध्यक्ष पदी निवडून आले. त्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलले असून, या निवडणुकीत युतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १५, भारतीय जनता पक्षाचे २, तर स्वतंत्र शिवसेना शिंदे गटाचे ३ उमेदवार निवडून आले आहेत.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती, तर शिवसेना उबाठा गटाने राष्ट्रीय काँग्रेसला सोबत घेत निवडणूक लढवली होती. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. पैकी शिंदे गटाला तीन जागा मिळाल्या, तर शरद पवार गटाला एकही जागा मिळाली नाही. श्रीवर्धन नगर परिषदेच्या मागील राजकीय इतिहासाकडे पाहता, याआधी प्रामुख्याने राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवडून येत होते. मात्र यंदा काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून न आल्याने काँग्रेस पूर्णतः बाहेर फेकली गेली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेत भाजपचा एकही नगरसेवक निवडून येत नव्हता, मात्र यंदा भाजपचे दोन उमेदवार निवडून आल्याने ‘भाजप इन’ झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले. या निकालानंतर श्रीवर्धन नगर परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष, तर सत्तास्थानी राष्ट्रवादी काँग्रेस–भाजप व विरोधी बाकावर शिंदे गटाचे समीकरण राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उबाठा गटाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल चौगुले निवडून आल्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, स्वतः नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी या चर्चांना पूर्णविराम देत कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याचे ठामपणे जाहीर केले आहे.
नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी नगर परिषदेत यापुढे पारदर्शक कारभार केला जाईल, निकृष्ट दर्जाच्या कामांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊनच शहराच्या विकासाची कामे केली जातील, असे स्पष्ट करतानाच निवडणुकी दरम्यान सोबत राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे, तसेच जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही त्यांनी जाहीर आभार मानले.
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचेही आभार मानले असून, हे कार्यकर्ते कोण हा मोठा विषय रंगत असून, खासदार सुनील तटकरे यांनाच आव्हान देणाऱ्या या कार्यकर्त्यांचा पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विचार होईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धनच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीमुळे नवे समीकरण उदयास आले असून, आगामी काळात नगर परिषदेत सत्तेचा खेळ अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.