मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे दुघर्टना होऊ नये यासाठी १२ डिसेंबर पासून विशेष तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या तपासणी अंतर्गत रेस्टॉरंट, पब्स आणि मॉल्ससह विविध गर्दीच्या ठिकाणची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी सध्या दिवसा करण्यात येत असली तरी येत्या २९ डिसेंबर २०२५ पासून आता रात्रीच्या वेळीही जावून पाहणी करून त्याठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून केली जाते का याची तपासणी केली जाणार आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व रेस्टॉरंट, पब्स, मॉल्स यांची १२ डिसेंबर २०२५ पासून व विशेष तपासणी मोहिम मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने हाती घेण्यात आली. या तपासणी अंतर्गत आतापर्यंत संपूर्ण मुंबईतील अनेक रेस्टॉरंट, पब्स आणि मॉल्सना भेटी देवून तपासणी करण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच इमारत कारखाना आदींच्यावतीने संयुक्तपणे पाहणी केली जात आहे. विना परवानगी एलपीजी सिलेंडर तसेच इतर सामुग्री जसे कि इंडकशन कूक टॉप, तंदूर भट्टी, ओव्हन्स, फ्रायर्स, बर्नर्स इत्यादी जप्त करण्यात येत आहेत. स्थानिक पोलीस स्थानक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचेशी समन्वय साधून कारवाई करण्यात येत असून येत्या २९ ते ३१डिसेंबर २०२५ या कालावधीत विशेष रात्र तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाई मध्ये विभाग कार्यालयाचे आरोग्य विभाग, इमारत व कारखाने विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी समाविष्ट असेल.