मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या कलाकारांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. सुरुवातीला सुरज चव्हाण, नंतर जय दुधाणे या दोघांनी काही दिवसांच्या फरकाने लग्नगाठ बांधली. ज्याची चर्चा सोशल मीडीयावर होत असतानाच अजून एका स्पर्धकाने आपल्या जीवनसाथीचे फोटो शेअर करत लग्नाबाबत गोड बातमी दिली आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेतून चाहत्यांच्या मनात घर केलेली सर्वांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. गायत्रीने आपल्या सोबतीचे फोटो सोशल मीडीयावर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच गायत्रीने 'माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालेली आहे' असे कॅप्शन देत चाहत्यांना प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. परंतु तेव्हा तिने होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता. यामुळे चाहत्यांमध्ये गायत्रीचा होणार नवरा कोण? हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता दिसत होती. अखेर नाताळाच्या दिवशी हि उत्सुकता संपली असून गायत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली. नाताळाच्या दिवशी गायत्रीने होणाऱ्या नवऱ्यासोबत एक रोमँटिक रील शेअर करत आहे . ज्यात तिने 'माझ्या आयुष्यभराच्या सांताला भेटा', असे कॅप्शन दिले आहे. गायत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओलाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, नुकताच प्राजक्ता गायकवाड ,पूजा बिरारी या अभिनेत्रींचे विवाह सोहळे पार पडले आहेत . तर , दुसरीकडे तरुणाईची आवडती अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचे साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. त्यामुळे ज्ञानदासुद्धा लवकरच सिनेमेटोग्राफर हर्षद आत्मारामसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचे समजते. तर, बिग बॉस मराठी फेम जय दुधाणेचेही नुकतेच लग्न झाल्याचे फोटो पाहायला मिळाले. या लगीनसराईच्या यादीत आता गायत्री दातारचे ही नाव जोडले गेले आहे. मात्र गायत्रीने अजून लग्नाच्या तारखेबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही.
कोण आहे गायत्रीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार ?
अभिनेत्री गायत्री दातारच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव श्रीकांत चवरे आहे. आयआयटी बॉम्बे मधून त्याचे शिक्षण पूर्ण झाले असून तो ड्रोन फोटोग्राफर आहे. श्रीकांत हा मुंबईचा असून त्याला ट्रॅव्हल आणि फोटोग्राफीची आवड आहे.