उबाठाशी युती राष्ट्रवादीच्या फळाला आली

मुरुडकरांनी जुन्यांना नाकारले तरुणांकडे धुरा!


उदय खोत नांदगाव मुरुड : मुरुड नगरपरिषदेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे अतिशय चुरशीची झाली. निकालापर्यंत कोण बाजी मारेल याचा सुतरामही अंदाज तसा कोणालाही बांधता आला नव्हता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या निवडणुकीत उबाठा गटाशी केलेली युती व नगराध्यक्ष पदासाठी आराधना दांडेकर या तरुण महिला उमेदवारावर लावलेली बाजी फळास आली आणि मागिल काही निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही बदल घडवून आणताना मुरुडकर मतदारांनी या बदला पुढे कोट्यवधींच्या विकास कामांकडे दुर्लक्ष करीत सर्वच पक्षांच्या काही उमेदवारांचा अपवाद वगळता जुन्या उमेदवारांना नाकारले आणि नवीन ताज्या दमाच्या तरुणांकडे नगरपरिषदेची धुरा दिली. मुरुड नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या आराधना दांडेकर यांनी माजी नगरसेवक तथा शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष संदीप पाटील यांच्या पत्नी व मुरुडच्या माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांचा २४५ मतांनी पराभव केला आणि त्या निवडून आल्या. दांडेकर यांना एकूण ४१९४ मते मिळाली तर कल्पना पाटील यांना ३९४९ मते मिळाली. शेकापच्या ॲड अंकिता माळी यांना केवळ ३०२ मते मिळाली तर नोटाला ८५ मते गेली. मुरुड नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्वात तरुण नगराध्यक्षा निवडून येण्याचा विक्रम आराधना दांडेकरांच्या नावे नोंदला गेला. हा बदल स्थानिक मतदारांना हवा होता म्हणूनच बहुतांशी प्रभागात त्यांना नाममात्र का होईना मतांची आघाडी घेतलेली दिसून येते.


या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्वबळावर एकही उमेदवार निवडून आणता आला नाही तशीच शेतकरी कामगार पक्षाचीही पाटी कोरीच राहीली. शिंदे गटाशी युती करून एक हमखासची जागा मिळाली असली तरी कॉंग्रेसची अस्तित्वाची लढाई येथे सुरू आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिलेल्या एकूण १९ उमेदवारांपैकी ११ उमेदवार निवडून आले तर त्यांच्या युतीतून एक कॉंग्रेस उमेदवार निवडून आला. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे एकूण १६ जागा लढवल्या त्यापैकी चार व शिवसेना उबाठा गटाने युतीतून लढविलेल्या ५ पैकी ४ जागा जिंकल्या, असे या युतीचे एकूण ८ उमेदवार निवडून आले. शिंदे गटाला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी गड आला पण सिंह गेला या म्हणी नुसार नगराध्यक्षपदाने मात्र यावेळी हुलकावणी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा उपप्रमुख मंगेश दांडेकर, सोशल मीडिया प्रमुख हसमुख जैन, अमित कवळे , तालुका युवक अध्यक्ष विजय भोय, महिला शहराध्यक्षा ॲड.मृणाल खोत यांच्यासह कॉंग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या डॉ.विश्वास चव्हाण, कॉंग्रेसचे महिला जिल्हाध्यक्षा पद उपभोगलेल्या व आता राष्ट्रवादी झालेल्या वासंती उमरोटकर यांना यावेळीही मतदारांनी नाकारले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या दोघांबरोबरच शिंदे गटाचे दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ, विघ्नेश माळी,राजा केणी यांनी स्वतःला झोकून दिले होते. आमदार दळवी यांनी मुरुडकरांच्या झोळीत विकासाचे भरभरून माप टाकले होते. मुरुडकरांना काय लागते याची मला पूर्ण कल्पना आहे असे ते म्हणत. येथील समुद्र किनारे सुशोभीकरण,समाज मंदिर, डॉ बाबासाहेबांचे स्मारक, शहरातील उद्याने,बागा, रस्ते अशी विविध तिनशेहून अधिक कोटींची कामे केली असल्यामुळे ते एक हाती सत्ता काबीज करतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती.परंतु खा. तटकरेंशी महायुतीत असूनही पंगा घेणे त्यांना महागात पडले. मंगेश दांडेकर देखील शिंदे गटात दाखल झाले होते परंतु त्यांचे पुनर्वसन करण्याकडे दळवींचे दुर्लक्ष झाले. तटकरेंनी त्यांना पुन्हा पक्षात घेऊन त्यांच्या तरुण मुलीला नगराध्यक्ष पदासाठी आजमावले त्यात ते यशस्वी ठरले, तर दळवींच्या पदरी निराशाच पडली. जोडीला कार्यकर्ते भरपूर पण मतदारांना आकर्षित करण्यात ते कमी पडले.भाजपनेही आपली वेगळी चूल मांडली. ऐनवेळी काँग्रेसबरोबर युती करून मुस्लीम मतदारांना त्यांनी चुचकारले एक जागाही सोडली पण ती कामी आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने उबाठाबरोबर आधीच बोलणी करुन आघाडी घट्ट केली होती. शेतकरी कामगार पक्षाने जास्त जागांसाठी धरलेल्या आग्रहामुळे त्यांच्याशी युती फिस्कटली एकदा चलो रे भूमिकेमुळे त्यांनी पराभव ओढावून घेतला. ते या आघाडीत असते तर अजून चित्र वेगळे दिसले असते. कॉंग्रेसनेही हातची संधी घालवली ती केवळ काही नेत्यांना असलेल्या तटकरेंच्या व्यक्तीद्वेषामुळे नगराध्यक्षपद पुन्हा मिळाल्यामुळे तटकरे मुरुडकरांवर खूप खूष झाले. मिळवलेली पकड ते यापुढे अधिक घट्ट करतील. कारण बर्याच विकास कामांचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. मुरुडकरांना चांगली संधी मिळाली आहे तिचे सोने करायला हवे.

Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,