आपला जो विषय आहे, अंधारातून प्रकाशाकडे त्याचा सरळ अर्थ आहे. तो म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे असा. मी अनेकदा सांगितलेले आहे, की आपल्या जीवनातील दुःखाचे कारण संसार नाही, बायकामुले, घरदार, नातीगोती नाहीत. आपल्या दुःखाचे कारण एकच आहे ते म्हणजे अज्ञान ! हे अज्ञान जोपर्यंत माणूस जोपासत आहे, पोसतो आहे तोपर्यंत मानव जात सुखी होणे कठीण आहे. आज समाज असा आहे की पैसे मिळवले की माणूस सुखी होईल. मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. पैसा जगण्यासाठी आवश्यक आहेच, पण सुख मिळवून देण्याचे सामर्थ्य पैशांत नाही, हे पहिले लोकांना समजले पाहिजे. बघा हं ! पैसा जगण्यासाठी आवश्यक आहे, पण सुख मिळवून देण्याचे सामर्थ्य पैशांत नाही हे समजले, तर जग सुखी होण्यास वेळ लागणार नाही. आज पेपर वाचला, तर त्यांत बहुतेक गोष्टी या पैशांवरून घडलेल्या दिसतात. प्रॉपर्टीवरून कोर्टकचेऱ्या होतात. लोकांचा प्रामाणिक समज आहे की पैसा मिळवला की सुखी होऊ. पण जगण्यासाठी पैसा आवश्यक असला तरी त्याने सुखी होता येत नाही. जगातील A TO Z समस्यांचे कारण हे अज्ञान आहे. आज नाटक सिनेमे बघितली तरी ज्या पात्रांकडे सर्व काही भरपूर असते, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, बायका-मुले आहेत तरीही ते दुःखी, आत्महत्या करतात. हे सांगतो आहे कारण लोकांना हे कळत नाही. माणूस भरपूर पैशाशिवायही सुखी होऊ शकतो. जीवनविद्या मिशनमधल्या एका नामधारकाने सुखसंवादात सांगितले, की माणूस पैशाशिवाय सुखी होऊ शकतो हे त्याला जीवनविद्या मिशनमध्ये आल्यावरच कळले. मलाही हेच सांगायचे आहे, पैशाशिवाय माणूस सुखी होऊ शकतो. लेखक, वक्ते हे सर्व लोक बोलत असताना नियतीचा उल्लेख करतात तेव्हा नियती ही आपल्या हातात नसणारी गोष्ट आहे, किंबहुना ती आकाशाच्या पलीकडे आहे व ती अदृश्य शक्ती आहे. ती आपल्या हातात सर्व सूत्रे ठेवून, आपणा सर्वांना बाहुल्यांप्रमाणे हलवित असते, असा नियतीबद्दल बहुतांशी सर्व लोकांचा समाज अगदी दृढ झालेला आहे. प्रत्यक्षात तो गैरसमज आहे. काही काळ आधी एक मालिका टीव्हीवर चालू होती. "भाग्यविधाता ". त्यात हा उपरवाला कुणीतरी आहे अशी समज करून दिलेली होती. जीवनविद्येच्या मते हा प्रत्यक्षात उपरवाला नाही, तर तो अंदरवाला आहे. ज्याला आपण भाग्यविधाता म्हणतो, भाग्य प्रदान करणारा, भाग्य देणारा म्हणतो, हा असा भाग्यविधाता व नियती हे दोन्ही एकच आहेत. हा भाग्यविधाता, ही नियती आकाशाच्या पलीकडे आहे हे मात्र खरे नाही. मग तो आहे कुठे? तो आहे आपल्याच कर्मात. हे कसे, ते सांगतो. प्रत्यक्षात कर्म करणे हा माणसाचा स्वभावच आहे. याचाच अर्थ असा की कर्म केल्याशिवाय माणूस राहूच शकत नाही. विचार, उच्चार व आचार या तीन स्तरावरून माणसाकडून कर्मे घडत असतात. सत्कर्म आणि दुष्कर्म असे कर्माचे दोन भाग पडतात व त्यातूनच प्रथम पाप-पुण्याची निर्मिती होऊन ती शुभ नियती व अशुभ नियती निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. माणसाच्या सुखदुःखाला ही नियतीच कारणीभूत ठरत असते.