चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत १५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
राष्ट्रीय महामार्ग ४८ वर भरधाव लॉरीने दिलेल्या धडकेमुळे बसने पेट घेतला आणि अवघ्या काही क्षणात या आगीने रौद्र रूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. हा अपघात चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियुर परिसरात झाला.
बंगळुरूहून शिवमोगाच्या दिशेने सीबर्ड कोच ही खासगी स्लीपर बस ३२ प्रवाशांना घेऊन जात होती. बसला समोरून येणाऱ्या एका वेगवान लॉरीने दुभाजक ओलांडत धडक दिली. अपघातामुळे बसच्या डिझेल टाकीचा स्फोट झाला आणि बसने पेट घेतला.
पलिकडच्या बाजूने जात असलेल्या लॉरीच्या चालकाने नियंत्रण गमावले. यामुळे लॉरी दुभाजक ओलांडत समोरून बसला जोरात धडकली. बसची डिझेल टाकी जिथे असते त्याच भागाला थेट धडक बसली. यामुळे बसने क्षणार्धात पेट घेतला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.