मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार
मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या अंगात शंभर हत्तीचे बळ आल्याचे बोलले जात आहे. परंतु, ज्यांनी मनसेची साथ सोडून उबाठामध्ये प्रवेश केला, त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ज्या मनसेवर टिका केली आणि तेथील वर्तणुकीमध्ये पक्ष सोडत उबाठा गटाची साथ धरली. त्या मनसेची मदत आता कशी घेतली जाणार, असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यातच मनसेतून उबाठा गटात गेलेल्यांना उमेदवारी देवू नये, याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेतील अनेकांनी त्या पक्षात प्रवेश देत राज ठाकरेंची साथ दिली. परंतु, २०१७ नंतर मनसेची ताकद मुंबईत कमी होवू लागल्यानंतर तसेच पक्ष संघटना वाढवण्याकडे कल नसल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी मनसेची साथ सोडली. यामध्ये वांद्र्यातील अखिल चित्रे, बोरीवलीतील चेतन कदम, नितीन नांदगावकर, किर्तीकुमार शिंदे, धारावीतील हर्षला मोरे, जोगेश्वरी गोरेगावमधील सुगंधा शेट्ये आदींनी उबाठा गटामध्ये मनसेला सोडून उबाठा गटात प्रवेश केला आणि उबाठा गटातून कामाला सुरुवात केली. परंतु, आता मनसेच एकत्र आल्यामुळे पक्ष सोडून उबाठात गेलेल्यांचे काय होणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अखिल चित्रे, सुगंधा शेट्ये, हर्षला मोरे तसेच चेतन कदम यांची पत्नी आता इच्छुक उमेदवारांच्या चर्चेत आहे. त्यामुळे आता जिंकण्यासाठी ही मंडळी मनसेची मदत कशी घेणार आणि आपला पक्ष सोडून जात आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त करणाऱ्यांना मनसैनिक कशी मदत करणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. या मनसेतून उबाठात आलेल्यांमुळे उबाठातील प्रस्थापितांच्या जागा गेल्या आहेत. त्यामुळे आधी मनसेला जागा सोडल्यामुळे नाराजी आहेतच त्यात मनसेतून आलेल्यांना उबाठाकडून तिकीट दिले जात असल्याने ही नाराजी तळाला अधिकच वाढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उबाठामध्ये मनसेतून गेलेल्यांना तिकीट देवून नये किंवा त्यांना तिकीट दिल्यास आम्ही मतदान करणार नाही किंवा त्यांना मदतही करणार नाही, अशा प्रकारचे वातावरण तयार होण्याची दाट शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मनसेतून उबाठात गेलेल्यांना उमेदवारी देवू नये, अशा प्रकारच्या सूचना आता राज ठाकरे यांच्याकडून दिल्या जातात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.