डॉक्टर, वकील शिक्षित उमेदवारांना मतदारांनी नाकारले !
राहुल देशमुख कर्जत : नगराध्यक्षपदासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार पुष्पा दगडे यांना एकूण १२९१६ मते मिळाली. तर महायुतीच्या उमदेवार डॉ.स्वाती लाड यांना ८४४६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा दगडे यांनी ४४७० भरघोस मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला. महायुतीने थेट नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित असा चेहरा देऊन विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे गेले होते. तर परिवर्तन विकास आघाडीने सत्ता परिवर्तन या मुद्द्यावर निवडणूक लढविली होती; परंतु कर्जत नगर परिषदेच्या मतदारांनी उच्चशिक्षित डॉ.स्वाती लाड यांना नाकारून १५ वर्षे नगरसेवक म्हणून अनुभव असलेल्या पुष्पा दगडे यांना नगराध्यक्ष म्हणून पसंती दिली.
आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार सुरेश लाड एकत्र येऊन प्रचाराची आघाडी घेतली होती; परंतु त्यांना कर्जत नगरपरिषद सत्ता मिळवण्यात अपयश आले. कर्जत नगर परिषदेच्या एकूण २१ नगरसेवक पदाचे उमेदवारांपैकी महायुतीचे ८ नगरसेवक निवडून आले. तर परिवर्तन विकास आघाडीचे १३ नगरसेवक निवडून आल्याने कर्जत नगर परिषदेवर परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा रोवला गेला. कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल पाहता पक्षांतर करणाऱ्या लालधारी पाल आणि बळवंत घुमरे यांना मतदारांनी नाकारले. माजी नगराध्यक्ष सुवर्ण जोशी या पुन्हा नगरसेविका पदी निवडून आल्याने इतिहासाची पुनरावृत्ती टाळली आहे. कारण यापूर्वी माजी नगराध्यक्ष राहिलेल्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. सर्वसाधारण जागेसाठी प्रभाग क्रमांक १ आणि प्रभाग क्रमांक ५ मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. परिवर्तन विकास आघाडीचे सोमनाथ पालकर यांना एकूण ९४२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार किशोर कदम यांना एकूण ९५६ मते मिळाली. केवळ १४ मतांनी किशोर कदम यांनी विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक ५ मध्ये देखील असेच चित्र पाहायला मिळाले. महायुतीचे विजय हजारे यांना एकूण ८६७ मते मिळाली. तर परिवर्तन आघाडीचे दिनेश ठोंबरे यांना एकूण ८३६ मतं मिळाली. ३१ मताच्या आघाडीने विजय हजारे यांचा विजय झाला. प्रभाग क्रमांक १० मध्ये देखील मोठी चुरस पाहायला मिळाली. पाचव्या आणि अंतिम फेरीत मानसी कानिटकर यांनी ५६ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. या निवडणुकीत सर्वाधिक मते प्रभाग क्रमांक ४ मधील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार महेंद्र चंदन यांना एकूण १५६३ मत मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमदेवार सुनील गोगटे यांना ४९६ मत मिळाली. गोगटे यांचा दारुण पराभव करून १०६७ अशा सर्वाधिक मतांनी महेंद्र चंदन निवडून आले. या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांना यांच्या महायुतीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माजी आमदार सुरेश लाड यांची सून डॉ.स्वाती लाड यांचा पराभव झाल्याने महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला. तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडीचे थेट नगराध्यक्ष पुष्पा दगडे आणि त्यांचे १३ शिलेदार निवडून आल्याने कर्जत नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या परिवर्तन विकास आघाडीच्या हाती आल्याचे पाहायला मिळाले. कर्जत नगर परिषद हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे करून देखील शिवसेनेची पिछेहाट झाल्याने विकासाचा मुद्दा घेऊन उच्च शिक्षित उमेदवार घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेल्या महायुतीला मतदारांनी का नाकारले याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. तर दुसरीकडे परिवर्तन विकास आघाडीला मतदारांनी कौल दिला आहे. कर्जत नगर परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळाल्याने पालिका क्षेत्रातील नागरी समस्या सोडविण्याचे मोठे आव्हान परिवर्तन विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या पुढे असणार आहे. एकूणच काय तर कर्जत नगरपरिषद २०२५ सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा काय किंवा उच्च शिक्षित उमेदवार काय हे मुद्दे गौण असून अर्थकारण आणि बाजारीकरण यावरच पालिकेची निवडणूक पहायला मिळाली हे मात्र नक्की.