मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा उडवण्याकरिता शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे.
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, दीपक केसरकर यांचा समावेश आहे. तसेच केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे हे प्रचार करणार आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी राज्यात शिवसेना - भाजप युती होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबतही शिवसेनेची युती होणार असल्याचे वृत्त आहे. जिथे अजित पवार हे शरद पवारांच्या गटाशी आघाडी करणार नाहीत त्याच ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा विचार करणार आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेना ८० पेक्षा जास्त आणि भाजप ४० पेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे. अद्याप या बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण राजकीय वर्तुळात या फॉर्म्युलाची चर्चा आहे. मुंबईत शिवसेना आणि भाजप यांच्यात २२७ पैकी १५० जागांबाबत सामंजस्यातून निर्णय झाला असल्याचे समजते. उर्वरित जागांबाबत निर्णयासाठी चर्चा सुरू असल्याचे समजते. लवकरच शिवसेना आणि भाजप युतीची आणि जागा वाटपाच्या सूत्राची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधूंनी मुंबईत युतीची घोषणा केली असली तरी जागा वाटपाचे सूत्र जाहीर केलेले नाही. यामुळे त्यांचे जागावाटप हे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतरच होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.