पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आणि त्यांच्या आसपासच्या भागात बंदी असलेल्या गांजा या अंमली पदार्थाची तसेच बंदी असलेल्या चायनीज मांजाची राजरोस विक्री होत आहे. तरुणाईच्या आरोग्याला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला गांजा आणि चायनीज मांजा या दोन संकटांनी ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ आणि लाखो रुपयांचा चायनीज मांजा यांची जप्ती केली. त्याचवेळी या समस्येची तीव्रता ठळकपणे समोर आली आहे.
गांज्याच्या समस्येने पुणे शहराला तर चायनीज मांज्याच्या समस्येने पिंपरी चिंचवडला प्रचंड मोठ्या ग्रासले आहे. हिंजवडी परिसरात असलेल्या एका घनदाट वस्तीच्या भागात फ्लॅट भाड्याने घेऊन तिथं गांजा पिकवला जात होता. हायड्रोफोनिक अर्थात विना मातीची गांजाची शेती केली जात होती. तर पिंपरी-चिंचवड शहरात सर्रासपणे जीवघेणा चायनीज मांजा, नायलॉन मांजा हा विकला जात आहे. हा मांजा काच आणि प्लॅस्टिकचा वापर करून बनवलेला असल्यानं तो तुटत नाही. पतंगबाजीच्या खेळात कटलेल्या पतंगाचा मांजा रस्त्यावर पसरतो आणि दुचाकीस्वारांचे गळे कापले जाणे, पक्ष्यांचे पंख छाटले जाणे, गंभीर अपघात होणे हे प्रकार होतात.
हायड्रोफोनिक गांजा तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे तसेच चायनीज मांजा हा रस्त्यावरून चालणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या जिवावर उठला आहे. यामुळे पोलिसांनी गांजा आणि चायनीज मांजा या दोन्हीची साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.