पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; ताज समूहासोबत लवकरच सामंजस्य करार
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणारी बातमी समोर आली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील निसर्गरम्य शिरोडा-वेळाघर येथे प्रख्यात ताज समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत (५ स्टार) हॉटेल उभारले जाणार आहे. हा प्रकल्प दीर्घकाळ प्रलंबित होता, मात्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तो आता प्रत्यक्षात उतरणार आहे.
शिरोडा-वेळाघर येथील जमिनीबाबत इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज समूह) यांनी सादर केलेल्या पुरक करार पत्रावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ताज समूहाच्या प्रतिनिधींनी हॉटेल उभारणीच्या योजना सविस्तार मांडल्या, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), स्थानिक ग्रामस्थ आणि ताज समूह यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. ग्रामस्थांना जमिनीच्या मोबदल्याचे वाटप दोन टप्प्यांत केले जाणार असून, हा मोबदला एक ते दोन आठवड्यांत देण्यात यावा, तसेच यासंबंधित सर्व न्यायालयीन खटले मागे घेण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्याचे राणे म्हणाले. या बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाइन), ताज समूहाचे प्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
ताज ग्रुपच्या आलिशान प्रकल्पाला 'ग्रीन सिग्नल' सिंधुदुर्ग : निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ...
फायदा काय होणार?
नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार वनराई, लांब समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभलेला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांना कायम मोहीत करीत असतो. शिरोडा-वेळाघर किनाऱ्याची नैसर्गिक सुंदरता आणि शांत वातावरणामुळे ताज समूहाचा हा प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरेल. या पंचतारांकीत हॉटेलमुळे जिल्ह्यात देशासह परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.