मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर पश्चिम मधील प्रभाग क्र. १२६च्या माजी नगरसेविका डॉ. अर्चना संजय भालेराव आणि माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी डॉ अर्चना एक आहेत. तर भाजपाचे स्थानिक आमदार राम कदम यांच्या विरोधात दोन वेळा आमदारकीची निवडणूक संजय भालेराव यांनी लढवली आहे.
शिवसेनेत उबाठाचे माजी नगरसेवक प्रवेश करत असताना आता आकांक्षा शेट्ये, तेजस्वी घोसाळकर यांच्या पाठोपाठ भालेराव दांपत्यानेही भाजपाचा झेंडा आपल्या हाती घेतला. उबाठाकडे राहिलेल्या नगरसेवकांपैकी आणखी माजी नगरसेवक भाजपाच्या समूहात सामील झाला आहे.
संजय भालेराव हे २०१२ मध्ये मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर नंतर २०१७मध्ये आरक्षण बदलल्याने त्यांची पत्नी डॉ अर्चना भालेराव यांना उमेदवारी मिळाली आणि त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर मनसेतून त्यांनी उबाठा मध्ये प्रवेश केला होता.
भालेराव दांपत्याने भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि माजी खासदार मनोज कोटक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी मंचावर , आमदार राम कदम, पक्षाचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, सरचिटणीस राजेश शिरवडकर, सरचिटणीस श्वेता परूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.