मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचा महासंग्राम आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने आगामी सात दिवस राज्याच्या राजकारणात कमालीची धामधूम पाहायला मिळणार आहे.
नागपूरमध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुटसुटीत व्हावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे, शहरातील ३८ प्रभागांची विभागणी १० झोनमध्ये करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना संबंधित महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात जाऊन आपले अर्ज सादर करावे लागतील. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी, राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अनेक ठिकाणी अद्याप सुटलेला नाही. कोणत्या प्रभागातून कोणाला तिकीट मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक कायम आहे. युतीची अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे, अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी किती उमेदवार धाडसाने पुढे येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अर्ज भरण्यास सुरुवात; प्रशासकीय यंत्रणा सज्ज
राज्यातील २९ महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नागपूरमध्ये ३८ प्रभागांसाठी १० झोन कार्यालयांत ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची सोय करण्यात आली आहे. पुण्यात १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. युती आणि आघाड्यांचे चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नसले तरी, अनेक इच्छुक उमेदवार आज मुहूर्तावर आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. ३० डिसेंबरनंतर अर्जांची छाननी होऊन निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
जंतुसंसर्ग रोखण्यासाठी पालिका सज्ज मुंबई : मुंबईतील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांना होणारा संसर्ग रोखण्यासाठी ‘सूक्ष्मजंतुनाशक ...
भाजपची 'एकला चलो रे'ची भूमिका; शुक्रवारी पहिली यादी
मुंबई वगळता इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. पुणे महापालिकेसाठी भाजपची पहिली उमेदवारी यादी शुक्रवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या पहिल्या यादीत सुमारे ८० उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते. प्रभागांनुसार सक्षम उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाली असून, पक्षाने आपली सर्व ताकद मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे.
पुण्यात राष्ट्रवादीचा पेच; काँग्रेसची सावध भूमिका
पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत अद्याप संभ्रम आहे. "योग्य न्याय मिळत असेल तरच सहभागी व्हा, अन्यथा महाविकास आघाडीसोबत राहा," अशा सूचना प्रदेश काँग्रेसने शहर पातळीवर दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे चित्र आहे.
पुणे-पिंपरीसाठी अजित पवारांची 'फिल्डिंग'
उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुक्काम ठोकून आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका काबीज करण्यासाठी त्यांनी स्वतः सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आज देखील बारामती हॉस्टेलवर पक्षप्रवेशांचा धडाका सुरू असून, इतर पक्षांतील अनेक मोठे चेहरे राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश करण्याची शक्यता आहे.
पिंपरीत भाजप-शिंदे युतीवर शिक्कामोर्तब; बारणेंचा मोठा दावा
पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी दावा केला आहे की, पिंपरीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची पारंपरिक युती कायम राहणार आहे. शिवसेनेने ३० जागांची मागणी केली असली तरी, सत्तेसाठी तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार गटाकडून अधिक जागांची ऑफर असूनही, शिवसेनेने भाजपसोबतच जाण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले आहे.