मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा मंगळवारी होणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी या युतीवर जोरदार हल्लाबोल केला असून, "मामूंची टोळी एकत्र आली तरी मुंबईत काही फरक पडणार नाही," असा टोला लगावला आहे.
दादर येथे माध्यमांशी संवाद साधताना साटम म्हणाले, राजकारणात कुणीही कोणाशी युती करू शकते, एकत्र येऊ शकते किंवा वेगळे होऊ शकते. मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर याचा काही परिणाम होणार नाही. "मामूंची टोळी एकत्र आली तरी मुंबई मनपा निवडणुकीत काही फरक पडणार नाही. ठाकरे गटाचे नेते-कार्यकर्ते सातत्याने भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मामूंच्या नादी लागल्यामुळे महाराष्ट्रभरात त्यांची दारुण अवस्था झाली आहे. त्यामुळे उरले-सुरलेलेही पक्ष सोडून भाजपमध्ये येत आहेत. हे लोक खरेतर हिंदुत्वासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत," असा दावा साटम यांनी केला.
साटम पुढे म्हणाले की, मराठी माणूस पूर्णपणे भाजपच्या आणि महायुतीच्या पाठीशी उभा आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला (रशीद खान) पक्षात प्रवेश दिल्यानंतर खरे हिंदुत्ववादी त्यांचा पक्ष सोडून जात आहेत. मराठी माणसाला चांगलेच माहीत आहे की, गेल्या ११ वर्षांत मुंबई शहराचा आणि मुंबईकरांचा विकास कुणी केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिला. बीडीडी चाळीतील मराठी कुटुंबांना १६० चौ.फूट ऐवजी ५६० चौ.फूट घर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मिळवून दिले. त्यामुळेच मराठी माणूस महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहे."
२५ वर्षांत मराठी माणसासाठी काय केले ?
"मुंबई महापालिकेत २५ वर्षे राज्य करूनही त्यांनी मुंबई आणि मराठी माणसासाठी एकही काम दाखवावे. आम्ही गेल्या ११ वर्षांत केलेली १० कामे सहज दाखवू शकतो. गेल्या २५ वर्षांत महापालिकेत बसूनही त्यांच्याकडे एकही काम दाखवायला नाही. किमान भविष्यात काय करणार हे तरी सांगावे. भावनिक मुद्दे सोडले तर दुसरा कोणताच मुद्दा त्यांच्याकडे नाही. मुंबईकरांना त्यांचे खरे स्वरूप कळलेले आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत," असे साटम म्हणाले.