एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूल
मुंबई : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मेट्रो लाईन २बी च्या कामासाठी पाडलेल्या जुन्या स्कायवॉकच्या जागी आता २७८ मीटर लांबीचा आधुनिक पादचारी पूल उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ४१.४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुढील १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हा नवीन पूल एस. व्ही. रोडवरून वांद्रे मेट्रो स्थानकाला थेट पश्चिम रेल्वे स्थानकाशी जोडणार आहे. यामुळे रेल्वेतून उतरून मेट्रोकडे जाणाऱ्या किंवा उलट प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना रस्त्यावरील गर्दीत न उतरता सुरक्षित प्रवास करता येईल. विशेषतः लकी हॉटेल जंक्शनवरील सिग्नल आणि वाहनांच्या गर्दीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.
स्थानिकांचा विरोध आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह
नव्या पुलाच्या नियोजनाबाबत स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींची नाराजी आहे. प्रकल्प आखताना स्थानिक एस. व्ही. रोड रहिवासी संघाशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. जुना स्कायवॉक अपग्रेड करण्याऐवजी पुन्हा तोच प्रयोग करणे म्हणजे नियोजनातील त्रुटी आहे, असे स्थानिकांनी सांगितले. नवीन प्रकल्पही जुन्या स्कायवॉकसारखाच 'पांढरा हत्ती' ठरू नये, अशी भीती आहे.