मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पराभव होण्याची भीती असल्यानेच ठाकरे बंधू एकत्र येऊन ‘प्रीतिसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ नाटक सादर करणार आहेत. हा 'भीतीसंगम' प्रयोग मतदार फ्लॉप ठरवणार आहेत, अशा शब्दांत भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी उबाठा- मनसे युतीची खिल्ली उडवली.
बन म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावाला घरातून हाकलले, त्यांचा मनसे पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला होता आता पराभवाच्या भीतीमुळे याच भावासाठी प्रीतीचे खोटे भरते येत आहे. राज ठाकरे १०० जागांची मागणी करत असताना त्यांच्या मनसेला ६० जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याची होत असलेली विकासाची घोडदौड मतदारांसमोर आहे. म्हणूनच ठाकरे बंधूंच्या या भीतीसंगम नाटकाच्या प्रयोगाचा कितीही गाजावाजा करत घाट घातला तरी ते नाटक रंगमंचावर येण्याआआधीच पडणार हे निश्चित आहे. महायुतीचा प्रयोग हाउसफुल्ल होणार आणि मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीचाच झेंडा फडकणार असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.
रोहित पवारांना प्रत्युत्तर
काँग्रेस ही भाजपाची बी टीम असा आरोप करणाऱ्या रोहित पवारांवर नवनाथ बन यांनी पलटवार केला. मविआचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा तिप्पट जागा मिळाल्या म्हणून असुयेपायी रोहित आरोप करत असल्याचे ते म्हणाले.