मुंबई पालिकेसाठी आंबेडकरांना प्रस्ताव; मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन झाल्यास उबाठाचे पानिपत अटळ
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित’शी आघाडी करण्याबाबत हालचाली तीव्र केल्या आहेत. नुकतेच मुंबई काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आंबेडकरांची भेट घेऊन यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली असून, दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक बैठका झाल्या आहेत. ही संभाव्य आघाडी प्रत्यक्षात उतरल्यास मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलतील. विशेषतः मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन होऊन, उबाठाला मोठा धक्का बसेल.
मुंबईत सुमारे ४७ मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील जागांची संख्या ४९ आहे. आतापर्यंतच्या अंदाजांनुसार, मुस्लिम मते काँग्रेसच्या पारड्यात पडतात, तर दलित मते ही उमेदवारनिहाय विविध पक्षांमध्ये विभागली जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यामुळे ही मते उबाठा गटासाठी फायदेशीर ठरली होती. मात्र, आता मविआमध्ये फूट पडली असून, काँग्रेसने मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. याशिवाय महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला आणि इतर नेत्यांनीही आंबेडकरांशी चर्चा केली आहे. आंबेडकरांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे. वंचितचा मुख्य मतदार दलित समाज असला तरी अल्पसंख्याक, ओबीसी आणि भटक्या जमातींमध्येही त्यांची संघटना मजबूत आहे. मुंबईच्या काही भागांत वंचितचे प्राबल्य आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितने राज्यात २०० हून अधिक जागा लढवल्या होत्या आणि ३.६ टक्के मते मिळवून मविआच्या किमान २० उमेदवारांना झटका दिला होता. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेस आता वंचितला सोबत घेऊन तिसरी आघाडी उघडण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेसला वंचितची गरज का?
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. एकूण २८८ नगराध्यक्ष पदांपैकी महायुतीने २१४ जागा जिंकल्या, तर मविआला फक्त ४४ जागा मिळाल्या. यात काँग्रेसने ३५ जागा जिंकून समाधानकारक कामगिरी केली, तर उबाठा गटाला केवळ ९ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ७ जागा मिळाल्या. या निकालाने काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून, मुंबईत वंचितला सोबत घेतल्यास विरोधी पक्षनेता बसेल, इतके नगरसेवक निवडून आणू शकतो, असा विश्वास पक्षश्रेष्ठींना आहे.
मुंबईत तिरंगी सामना?
उबाठा गटाची मुख्य मदार मराठी मतांवर आहे. ठाकरे बंधूंनी मराठी विरुद्ध गुजराती असा ध्रुवीकरणाचा प्रयत्न सातत्याने केला आहे. दुसरीकडे, मुस्लिम मते आपल्याकडे वळतील असा उबाठाला विश्वास आहे. मात्र, काँग्रेसने आपला पारंपरिक मतदार (मुस्लिम आणि दलित) टिकवून ठेवण्यासाठी वंचितशी हातमिळवणी केल्यास हे समीकरण ठाकरे बंधूंना मारक ठरेल. एकूणच, काँग्रेस-वंचितची आघाडी झाल्यास मुंबई महापालिकेत महायुती विरुद्ध उबाठा-मनसे विरुद्ध काँग्रेस-वंचित असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे.