हैद्राबाद : दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवालप्रमाणेच आता समंथा रूथ प्रभूही चाहत्यांच्या गर्दीत अडकली आहे. हैदराबादमध्ये आयोजित एका स्टोअरच्या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर समंथाभोवती चाहत्यांनी अचानक गराडा घातला. कार्यक्रम संपवून बाहेर पडताना गर्दी इतकी वाढली की समंथाला कशीबशी वाट काढत आपल्या गाडीपर्यंत पोहोचावं लागलं.
या वेळी काही चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आरडाओरडा करत होते, तर काहींनी मर्यादा ओलांडत तिच्या साडीचा पदर ओढल्याचंही पाहायला मिळालं. एका व्हिडीओमध्ये समंथा गर्दीत वेढलेली दिसत असून तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाल्याचं स्पष्ट दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील लूलू मॉलमध्ये निधी अग्रवाल चाहत्यांच्या गर्दीत अडकली होती. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता त्याच शहरात समंथा रूथ प्रभूसोबतही असाच प्रकार घडल्याने चाहत्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
समंथानं या लॉन्च कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती आणि कार्यक्रमातील तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कार्यक्रम सोडून गाडीकडे जात असताना परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसून आलं.
दरम्यान, कार्यक्रमापूर्वी समंथानं तिच्या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. काळ्या सिल्क साडीमध्ये, स्लीव्हलेस ब्लाउज, हेव्ही गोल्डन इयररिंग्स आणि कपाळावर काळी टिकली असा लूक तिनं साकारला होता. या पारंपरिक अंदाजात समंथा विशेष आकर्षक दिसत होती.
याआधी प्रभासच्या आगामी ‘द राजा साब’ चित्रपटातील ‘सहाना सहाना’ गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये निधी अग्रवालही गर्दीत अडकली होती. त्या घटनेनंतर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात आली होती. आता समंथासोबत घडलेल्या प्रकारामुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.