पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने १७ पैकी १० जागांवर नगराध्यक्ष निवडून आणत दबदबा दाखवून दिला. या निवडणुकीतून उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्यातील आपली दादागिरी पुन्हा एकदा सिद्ध केली तर शिंदे गटानेही चांगली कामगिरी करीत चार नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष निवडून आणण्याची किमया केली. तर तीन नगरपरिषदांवर भाजपाचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. विरोधकांना मात्र भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र आहे.
पुणे जिल्हा हा पवार कुटुंबीयांचा गड म्हणून ओळखला जातो. नगर परिषद निवडणुकीत भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष बहुतेक नगर परिषदांमध्ये परस्परांविरोधात लढले. त्यात राष्ट्रवादीचा अधिक फायदा झाल्याचे दिसत आहे. सासवडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना गळाला लावल्याचा भाजपाला निश्चित फायदा झाला. मात्र, भोरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना घेऊन राष्ट्रवादीला मात देण्याची भाजपाची खेळी फसली. दुसऱ्या बाजूला एकाही नगरपरिषदेवर महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून न आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व ठाकरेसेनेवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र सोनवणे यांनी भाजपाच्या गिरीश कांबळे यांच्यावर १० हजार ६८१ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या लोणावळा नगरपरिषदेवर आता राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आली आहे. आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने १६ जागांसह निर्विवाद यश मिळविले. भाजपा ४, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १, राष्ट्रीय काँग्रेस ३ तर अपक्षांनी ३ जागा प्राप्त केल्या.
वडगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने १७ पैकी ९ जागांवर झेंडा फडकवत आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपला ६, तर अपक्षांना २जागा मिळाल्या. नगराध्यक्षदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या अबोली मारे यांनी सरशी साधत भाजपच्या अॅड मृणाल म्हाळसकर यांना पराभूत केले. मावळ मतदारसंघातील वडगाव नगरपंचायतीवर सुनील शेळके यांचे वर्चस्व होते. या निवडणुकीतही शेळके यांनी आपला वरचष्मा कायम राखला आहे.
तळेगाव नगरपरिषद निवडणुकीवर भाजप राष्ट्रवादी युतीने वर्चस्व मिळविले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत युतीच्या संतोष दाभाडे यांनी विजयाचा झेंडा फडकवला. दाभाडे हे भाजपाचे नेते आहेत. नगपरिषदेच्या २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १०, तर भाजपाचे ९ नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ७, तर भाजपचा एक जण निवडून आला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ १७, तर भाजपचे संख्याबळ १० वर पोहोचले. तर एक अपक्ष उमेदवारही निवडून आला.
चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या मनीषा गोरे यांनी तब्बल १४ हजार मते घेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिमाखदार विजय मिळविला. चाकण नगर परिषदेत एकूण २५ जागा आहेत. चुरशीच्या लढतीत शिंदे गटाने १३, राष्ट्रवादी अजित पवार गटाने १० जागांवर बाजी मारली. तर ठाकरेसेनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागेल. एक जागा अपक्षाला मिळाली. नगराध्यक्षपद निवडणुकीत दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका ठाकरेसेनेने घेतली होती.
आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह भाजपाने १५ जागा मिळवत विरोधकांचे पानिपत केले. नगराध्यपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रशांत कुऱ्हाडे यांनी अजित पवार गटाच्या प्रकाश कुऱ्हाडे यांचा ६ हजार ६९० मतांनी पराभव केला. नगरपरिषदेच्या २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिंदे गटाला ४, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला २ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेस, ठाकरेसेना व अपक्षांना भोपळाही फोडता आला नाही.
राजगुरूनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश गुंडाळ यांनी बाजी मारली.
जुन्नर नगर परिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या सुजाता काजळे यांनी सरशी मिळवली. या माध्यमातून शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. मंचर नगर परिषदेच्या निवडणुकीतही शिंदे गटाच्या राजश्री गांजाळे यांनी विजयाचा गुलाल उधळला.
शिरूर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचर्णे यांनी भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. नगरपरिषदेत एकूण २४ जागा असून, भाजपाला ११, अजित पवार गटाला ७, तर शरद पवार गटाला ५ जागा मिळाल्या.
दौंडमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या दुर्गादेवी जगदाळे यांनी बाजी मारली. तर जेजुरीतही नगराध्यक्षपदाच्या निवडुकीत राष्ट्रवादीच्या जयदीप बारभाई यांनी यश मिळविले. फुरसुंगीत नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संतोष सरोदे निवडून आले. तर माळेगावातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुजय सातपुते यांनी नगराध्यक्षपदावर नाव कोरले.
इंदापूर नगर परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. इंदापूरमध्ये अजित पवार यांनी आयत्या वेळी भरत शहा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले पक्षाचे नेते प्रदीप गारटकर यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रवीण माने यांनीही गारटकर यांना पाठिंबा दिला होता. मात्र, अटीतटीच्या लढतीत अखेर भरत शहा यांनी मैदान मारले.
सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार संजय जगताप यांच्या मातोश्री भाजपाच्या आनंदी काकी जगताप यांनी बाजी मारली.
भोरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटापुढे व आमदार शंकर मांडेकर यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, भोरचे नगराध्यक्षपद पटकावत राष्ट्रवादीने भाजपला दणका दिला.
बारामतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपला गड राखला आहे. पण, पाच अपक्षही निवडून आले आहेत. त्यामुळे जरा धक्का बसल्यासारखे आहे.