मुंबई : महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्याचे मतदान २ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान २० डिसेंबर रोजी झाले. आता मतमोजणी आज म्हणजेच रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात शनिवारी झालेल्या २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७.०४ टक्के मतदान झाले होते. याआधी राज्यात पहिल्या टप्प्यात २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान झाले.
दोन्ही टप्प्यात महायुतीच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत होते. यामुळे निकाल कसे लागणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.
- २४६ नगरपरिषदा
- ४२ नगरपंचायती
- २८८ एकूण नगरपरिषदा, नगरपंचायती
- रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात