लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि तयारी... …पण कधी कधी हाच आनंद गोंधळात बदलला तर? अशाच एका गोंधळावर आधारित ‘लग्नाचा शॉट’ हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यातून चित्रपटाचा हलकाफुलका, मजेशीर मूड स्पष्टपणे दिसून येतो. चित्रपटाच्या नावावरूनच हा प्रकार काहीसा वेगळा आणि धमाल असणार, याची कल्पना येते. लग्नाच्या धावपळीमध्ये घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, चुकीचे अंदाज, गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ याभोवती या चित्रपटाची गोष्ट फिरते. दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, 'लग्नाचा शॉट' हा चित्रपट म्हणजे लग्नाच्या गोंधळाकडे मजेशीर पद्धतीने पाहणारी गोष्ट आहे. कोणालाही कंटाळा न येता, संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल, असा हा निव्वळ मनोरंजनाचा अनुभव आहे. कुठलाही संदेश देण्याचा अट्टहास नाही, कुठलाही गंभीर सूर नाही, केवळ हलकंफुलकं, स्वच्छ आणि प्रामाणिक मनोरंजन हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.