मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने बांधण्यात आलेली पूल आता महापालिकेला हस्तांतरीत झाली आहे. त्यामुळे हस्तांतरित झालेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील सहा पुलांची डागडुजी आता महापालिकेच्यावतीने केली जाणार आहे. या मार्गावरील सर्व पुलांची दुरवस्था झाल्याने या पुलांवरील पृष्ठभागाची मास्टिकचा वापर करून त्याची डागडुजी केली जाणार आहे. मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महानगरपालिकेस सुधारणा देखभाल करण्यासाठी आहे तशा स्थितीत २९ नोव्हेंबर २०२२ रोजी हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. एकूण १९ किलोमीटर आणि सरासरी ६० मीटर रुंद असलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गाची देखभाल महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. तसेच पावसाळ्यात या मार्गावर तसेच पुलांवर खड्डे पडू नये यासाठीचीही काळजी घेतली जात आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील एमएमआरडीएच्या अखत्यारित असलेली पुलही महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे.
यामध्ये ऐरोली, जे. व्ही. एल. आर, विक्रोळी, ए. जी. एल. आर, छेडा नगर, अंधेरी कुर्ला लिंक रोड आदी पुलांचा समावेश आहे. या पुलांची व इतर दुरवस्था झाल्याने या पुलांच्या पृष्ठभागाची मास्टिक वापरून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात पूर्व द्रुतगती मार्गावर खड्डे पडणार नाहीत व त्यावरील प्रवास सुखकर होईल. या अानुषंगाने पुलांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आल्याचे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्यावतीने पूर्व द्रुतगती महामार्गावरील दुरवस्था झालेल्या काही भागांची आणि पुलांच्या पुष्ठभागाची सुधारणा मास्टिक डांबराचा वापर करण्याकरता सुमारे ६५कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या डागडुजीच्या कामांसाठी स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात
आली आहे.