मीरा भाईंदर : पुणे आणि नागपूरनंतर आता मुंबईलगतच्या मीरा भाईंदर शहरात बिबट्याच्या वावराने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (२० डिसेंबर) सकाळी मीरा भाईंदर पूर्वेकडील तलाव मार्ग परिसरात एका बिबट्याने शिरकाव केला. पहाटेच्या सुमारास हा बिबट्या मानवी वस्तीत आल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. एका इमारतीच्या जिन्यातून वर चढत असताना, पहिल्या मजल्यावरील एका घराचा मागचा दरवाजा उघडा दिसताच बिबट्याने थेट घरात प्रवेश केला आणि तो तिथेच अडकला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याने समोर येणाऱ्या लोकांवर झडप घालण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये सात जण जखमी झाले. यामध्ये सहा जणांना किरकोळ दुखापत झाली असली, तरी एका तरुणीवर बिबट्याने गंभीर हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या घरात अडकल्यामुळे त्याला सुखरूप बाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. दरम्यान, ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती, ज्यामुळे बचाव कार्यात काही काळ अडथळे आले. अखेर तब्बल ८ तासांच्या थरारानंतर वनविभागाने बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात यश मिळवले. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय साधारण ४ ते ५ वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
घरात घुसला बिबट्या; बाल्कनीत आणि खिडकीत लपून वाचवला जीव
शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जेव्हा मीरा भाईंदरमधील तलाव मार्ग परिसर नुकताच जागा होत होता, तेव्हा एका बिबट्याने शिरकाव केल्याने एकच धांदल उडाली. हा बिबट्या इमारतीच्या आवारात आणि कुंपणावरून उड्या मारताना पाहताच नागरिकांची घाबरगुंडी उडाली. सुरुवातीला या हिंस्र प्राण्याने परिसरात उपस्थित असलेल्या दीपू भौमिक (५२) आणि छगनलाल बागरेचा (४८) यांच्यावर झडप घातली. एवढ्यावरच न थांबता, बिबट्याने मोर्चा 'पारस' इमारतीकडे वळवला आणि जिन्यातून वर चढताना रामप्रसाद सहानी व राकेश यादव यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जखमी केले.
या घटनेतील सर्वात थरारक प्रसंग भारती टांक यांच्या घरात घडला. पहिल्या मजल्यावरील या घराचा दरवाजा उघडा पाहून बिबट्या थेट आत शिरला. समोर दिसलेल्या १९ वर्षीय खुशबू आणि भारती टांक यांच्यावर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रसंगावधान राखून या दोघींनी बाल्कनीच्या लोखंडी जाळीचा आधार घेत स्वतःला सुरक्षित केले. मात्र, याच वेळी बेडरूममध्ये झोपलेली २३ वर्षीय अंजली टांक आवाजामुळे जागी होऊन बाहेर आली. समोर बिबट्याला पाहताच तिची पाचावर धारण बसली. बिबट्याने थेट अंजलीवर हल्ला चढवत तिचे तोंड, हात आणि डोक्याला गंभीर दुखापत केली. अंजलीच्या किंचाळण्यामुळे बिबट्या क्षणभर बाजूला झाला, याच संधीचा फायदा घेऊन जखमी अंजलीने बेडरूमच्या खिडकीत आश्रय घेतला.
लग्नाची लगबग अन् बिबट्याची झडप! जखमी अंजलीवर प्लास्टिक सर्जरीची वेळ
ज्या घरात सनई-चौघड्यांचे स्वप्न पाहिले जात होते, तिथे आता रक्ताचे सडे आणि भयावह शांतता पसरली आहे. मीरा भाईंदरमधील टांक कुटुंबात सध्या अंजलीच्या विवाहाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, शुक्रवारी सकाळी घरात शिरलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ही तरुण मुलगी गंभीर जखमी झाली आहे. लग्नाचे स्वप्न डोळ्यासमोर असतानाच अंजलीच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि हातावर बिबट्याने गंभीर जखमा केल्याने संपूर्ण कुटुंब मानसिक धक्क्यात आहे.
अग्निशमन दलाने खिडकीतून केले रेस्क्यू
बिबट्या घरातच ठाण मांडून असल्याने जखमी अंजलीला बाहेर काढणे मोठे आव्हान होते. यावेळी अग्निशमन अधिकारी जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुद्धा नांगरे, नंदकुमार घरत, मयूर पाटील आणि अमर पाटील या जवानांनी जीवाची बाजी लावली. बिबट्या समोर असतानाही अत्यंत धैर्याने शिडीच्या साहाय्याने या जवानांनी खिडकीत अडकलेल्या अंजलीची सुटका केली आणि तिला सुरक्षितपणे बाहेर काढले.
केईएम रुग्णालयात उपचार सुरू
अंजलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला सुरुवातीला भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, चेहऱ्यावरील जखमा खोल असल्याने आणि सौंदर्याला बाधा पोहचू नये म्हणून डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील उपचारांसाठी तिला आता मुंबईच्या केईएम (KEM) रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लग्नासारखा आनंदाचा क्षण उंबरठ्यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भारती टांक यांनी माहिती देताना सांगितलं की...
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अंजलीच्या आईने भारती टांक यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आम्ही सगळे बसलो होतो, तेव्हा बिबट्या मागच्या दाराच्या जाळीतून आत आला. तेव्हा आम्ही मी आणि माझी एक मुलगी बाहेर पळालो आणि दुसरी मुलगी रूममध्ये झोपली होती तिच्यावर बिबट्याने हल्ला केला. आमचा पुढचा दरवाजा बंद होता मागच्या जाळीतून तो आत मध्ये आला. सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारतीच्या खाली सर्वजण ओरडत होते, तेव्हा मी आणि माझी छोटी मुलगी बाहेर पडलो, तेव्हाच तो मागच्या दारातून आमच्या घरामध्ये घुसला. आम्ही घराबाहेर पडलो पण आमची मोठी मुलगी झोपलेली होती. आवाज ऐकून ती बाहेर आली तेव्हा तिच्यावर बिबट्याने झडप मारली.
उपवनसंरक्षक सचिन रेपाळे, वन परिक्षेत्र अधिकारी वळवी, काळभोर आदी व कर्मचारी व रोहित मोहिते, संतोष शिंदे यांच्या पथकाने बंदुकीने भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आणखी आक्रमक झाला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात इंजेक्शन लागले आणि तो बेशुद्ध झाला.