मुंबई : बॉलिवूडमधील ‘मर्डर’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या व्हाईट हाऊस ख्रिसमस डिनरला मल्लिकाने उपस्थिती लावली असून तिच्या या उपस्थितीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अत्यंत मोजक्या आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातील काही खास क्षण मल्लिकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे व्हाईट हाऊस सोबत काढलेले फोटो आणि कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
या खास प्रसंगासाठी मल्लिकाने गुलाबी रंगाचा स्लिप ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने फर जॅकेट मॅच केले असून तिचा हा लूक सोशल मीडियावर विशेष पसंतीस उतरला आहे. चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.
मल्लिकाने केवळ फोटोच नाही तर कार्यक्रमादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या भाषणाचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत. यासोबतच तिला मिळालेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेचा फोटो पोस्ट करत तिने हा अनुभव स्वप्नवत असल्याची भावना व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसच्या ख्रिसमस डिनरला आमंत्रण मिळणे हे माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
मात्र, मल्लिकाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक चाहत्यांनी तिचे अभिनंदन करत जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला हे आमंत्रण नेमके कशामुळे मिळाले, असा सवाल उपस्थित केला आहे. काहींनी थेट प्रश्न विचारत कुतूहल व्यक्त केले, तर काहींनी या पोस्टला दिखावा असल्याची टीकाही केली आहे.
दरम्यान, मल्लिकाचा व्हाईट हाऊसशी संबंध नवा नाही. यापूर्वी २०११ साली बराक ओबामा यांच्या कार्यकाळात तिने व्हाईट हाऊस करस्पॉडंट्स डिनरला हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या ‘पॉलिटिक्स ऑफ लव्ह’ या चित्रपटामुळे तिला हे विशेष निमंत्रण मिळाले होते.