मुंबई : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजीत करत असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. विश्वचषकासाठी भारताचा १५ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे. दुखापतीमुळे शुभमन गिलचा संघात समावेश केलेला नाही. जितेश शर्माचाही या संघात समावेश झालेला नाही. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या उपस्थितीत टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी १५ खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ जाहीर केला आहे.
सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे तर अक्षर पटेल या संघाचा उपकर्णधार असेल. संजू सॅमसन आणि ईशान किशन या दोघांचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग
जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या अखेरपर्यंत अक्षर भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेपासून गिल संघाचा उपकर्णधार झाला. पण मानेच्या दुखापतीमुळे मागील काही दिवसांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलेला नाही. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यामुळेच गिलचा टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघात समावेश केलेला नाही.
गिलने २०२५ मध्ये फक्त १५ टी ट्वेंटी सामने खेळून २९१ धावा केल्या. यात एकाही अर्धशतकाचा अथवा शतकाचा समावेश नाही. एकूणच गिलला २०२५ हे वर्ष विशेष लाभाचे ठरले नाही. आता दुखापतीमुळे त्याचा टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघात समावेश झालेला नाही.