नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि माजी आमदार संदीप नाईक हे लवकरच स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतण्याची शक्यता आहे. या संदर्भात आज दुपारी संदीप नाईक यांनी त्यांचे बंधू संजीव नाईक आणि सागर नाईक यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही गुप्त भेट पार पडली असून, संदीप नाईक यांचा भाजप प्रवेश आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो, असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध बंडखोरी करून शरद पवार गटात गेलेले माजी आमदार संदीप नाईक आता पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून कोणत्याही क्षणी त्यांच्या अधिकृत 'घरवापसी'ची घोषणा होऊ शकते. मागच्या विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत संदीप नाईक यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
संदीप नाईक यांच्या या पुनरागमनामुळे नवी मुंबईचे कद्दावर नेते गणेश नाईक यांची ताकद कैक पटीने वाढणार आहे. वडील आणि मुलाची शक्ती पुन्हा एकाच पक्षात एकवटल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपची पकड शहरावर अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. या प्रवेशामुळे महायुतीमधील स्थानिक समीकरणे आणि अंतर्गत स्पर्धा कशी वळण घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.