अजित पवार आणि सुनील तटकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; मुंबई पालिका निवडणूक महायुतीमधून लढवण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
मुंबई : नवाब मलिक राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असलीत, तर त्यांच्याशी युती करणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपने घेतल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबई पालिकेबाबत आपली रणनीती बदलली आहे. नवाब मलिकांना 'साईडलाईन' करीत, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी चर्चेची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. पवार आणि तटकरे यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा तोडगा निघाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत आतापर्यंत दोन संयुक्त बैठका पार पडल्या आहेत. मात्र, या बैठकींमध्ये महायुतीचा महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. कारण, भाजपने नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत युती करण्यास स्पष्ट नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांना बाजूला ठेवून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वतः भाजप नेत्यांसोबत चर्चेची धुरा सांभाळली आहे. शुक्रवारी मध्यरात्री भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार आणि सुनील तटकरे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्याआधी अजित पवार आणि तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाली.
मुंबईत ५० जागांचा प्रस्ताव
आशिष शेलार यांच्यासोबतच्या बैठकीत तटकरे यांनी महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका मांडली. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मुंबईसह इतर महापालिकांमध्ये महायुतीने एकत्र लढावे आणि त्यात राष्ट्रवादीचा सहभाग असावा, अशी विनंती केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारच्या बैठकीत राष्ट्रवादीने मुंबईत सुमारे ५० जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. आशिष शेलार आणि सुनील तटकरे हे नेते पुढील चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर करतील.
मुख्यंत्र्यांसोबत १ तास चर्चा
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल १ तास चर्चा केली. शक्य तितक्या पालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र लढावे, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अमरावतीमध्ये राष्ट्रवादीने स्वबळावर लढावे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तसेच काही ठिकाणी स्थानिक पातळीवर शरद पवारांसोबत आघाडीच्या चर्चा सुरू असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना यावेळी देण्यात आली.