भारतातील आघाडीचे ओटीटी अॅग्रीगेशन प्लॅटफॉर्म ‘टाटा प्ले बिंज’ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये ‘अल्ट्रा प्ले’ आणि ‘अल्ट्रा झकास’ या दोन नवीन अॅप्सचा समावेश केला आहे. या अॅपमुळे आता प्रेक्षकांना हिंदी आणि मराठी भाषेतील दर्जेदार मनोरंजनाचा खजिना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
हिंदी चित्रपटांचा मोठा संग्रह: ‘अल्ट्रा प्ले’
हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी ‘अल्ट्रा प्ले’ हे अॅप खास पर्वणी ठरणार आहे. यामध्ये १९४३ पासूनचे क्लासिक चित्रपट ते आधुनिक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. यात गदर : एक प्रेम कथा, ३ इडियट्स, दबंग, क्रिश, अंदाज अपना अपना आणि गजनी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसोबतच वेब सिरीज आणि डब केलेले दाक्षिणात्य व हॉलिवूड चित्रपटही पाहता येणात आहेत.
मराठी संस्कृतीचे दर्शन : ‘अल्ट्रा झकास’
मराठी प्रेक्षकांसाठी ‘अल्ट्रा झकास’ हे अॅप ४,००० तासांहून अधिक मराठी कंटेंट ऑफर करते. यात बेटर हाफची लव्ह स्टोरी, जिलेबी, एक डाव भुताचा यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांसह १५०० हून अधिक शीर्षके उपलब्ध आहेत.
३६ अॅप्ससह भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म
या दोन नवीन अॅप्सच्या समावेशामुळे टाटा प्ले बिंज आता ३६ अॅप्ससह भारतातील सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म बनला आहे. टाटा प्लेच्या मुख्य कमर्शियल आणि कंटेंट ऑफिसर पल्लवी पुरी यांनी सांगितले की, या नवीन अॅप्समुळे आमची हिंदी आणि मराठी ऑफरिंग अधिक मजबूत झाली आहे, तर अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक सुशीलकुमार अग्रवाल यांनी या सहयोगाला प्रादेशिक कंटेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाचा टप्पा मानले आहे. आता टाटा प्ले बिंजच्या सबस्क्राइबर्सना प्राइम व्हिडिओ, झी ५, अॅपल टीव्ही+, आणि हंगाामा यांसारख्या ३० हून अधिक अॅप्ससोबतच ‘अल्ट्रा’च्या या नवीन सेवांचा आनंद एकाच प्लॅटफॉर्मवर घेता येईल.