चास आश्रमशाळेतील प्रकार
मोखाडा : मोखाडा तालुक्यातील चास आश्रमशाळेत एका १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत घडलेल्या विचित्र प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वस्तीगृहात सर्व विद्यार्थी झोपलेले असताना ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने सुविदासच्या डोक्यावरील केस आणि भुवया अशा पद्धतीने कापल्या की, त्याला काही ठिकाणी जखमा देखील झाल्या आहेत.
आपल्या मुलाच्या बाबतीत घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे वडील शंकर जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "आश्रमशाळेत मुले सुरक्षित नसतील तर कोणाकडे बघायचे? जर रात्रीच्या वेळी एखादा मोठा अनर्थ घडला असता, तर त्याला जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल पालकांनी विचारला आहे. तसेच वस्तीगृहातील अधीक्षकांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाबाबत मुख्यध्यापक संजय गडपाले यांना विचारणा केली असता, त्यांनी हा प्रकार मुलांनीच एकमेकांच्या खोड्या काढताना केला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मुलांच्या वस्तीगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.