मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आवश्यक दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांची अंतिम यादी तयार करण्यापूर्वी मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करावी. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नियोजित कालमर्यादेत नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथके कार्यरत ठेवावीत, असे विविध निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले आहेत. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस, उत्पादन शुल्क व इतर विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात .निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवण्यात यावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांमध्ये विशेष दक्षता घ्यावी ,असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरुवारी १८ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात संपन्न झाली. महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी हे अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी आयुक्त महोदय बोलत होते. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (सुधार) संजोग कबरे, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किेशोर गांधी, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, कोकण विभागाच्या अपर आयुक्त फरोघ मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांच्यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक मतदान केंद्र निश्चितीबाबत निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार, मुंबईत सुमारे १० हजार १११ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, रॅम्प आदींची सुविधा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्याची पाहणी, पडताळणी करावी. त्यानंतर अंतिम मतदान केंद्र यादी तयार करावी. मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी मतदान केंद्रानजीक 'मतदार सहाय्य केंद्र' स्थापित करावे. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती देणारे फलक लावावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
निवडणूक प्रकिेयेसाठी आवश्यक अधिकारी - कर्मचारी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक कामकाजात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया, निवडणूक कायदे, आदर्श आचारसंहिता, ईव्हीएम हाताळणी तसेच मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेणे बंधनकारक असून दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी महानगरपालिका परिमंडळ उप आयुक्त, प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त याच्याशी संवाद साधावा. समन्वय साधून कार्यवाही करावी, अशी सूचनाही गगराणी यांनी केली.
आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पोलिस विभाग, उत्पादन शुल्क विभाग तसेच इतर संबंधित विभागांच्या समन्वयातून सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवण्यात यावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांमध्ये विशेष दक्षता घ्यावी. नियमित गस्त, तपासणी नाके, वाहन तपासणी, तसेच संशयास्पद हालचालींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार त्वरित व कठोर कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले आहेत.