मिलिंद गवळी यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच त्यांची ‘वचन दिले तू मला’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. यानिमित्ताने त्यांनी यातील त्यांची भूमिका आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील भूमिकांबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील त्यांच्या पात्रामुळे लोक खूप शिव्या द्यायचे. पण ‘वचन दिले तू मला’ या नवीन मालिकेतील भूमिकेबद्दल म्हणाले, हर्षवर्धन जहागीरदारची ही भूमिकासुद्धा खूप रंजक आहे. त्याला कायद्याची खूप जाण आहे. ते वकिलांचे कुटुंब आहे. मला वकिलाची भूमिका करायचीच होती. पण ती भूमिका सकारात्मक आहे की नकारात्मक हे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, वाहिनी ठरवेल माझ्याकडे जेव्हा भूमिका येते तेव्हा मी कधीच त्याकडे नकारात्मक आहे या पद्धतीने पाहत नाही. अनिरुद्धकडेही मी कधीच नकारात्मक दृष्टीने पाहिले नव्हते. अनिरुद्ध एक चांगला मुलगा होता. आई-वडिलांवर प्रेम करणारा, मुलांवर प्रेम करणारा, बायकोवर अन्याय करतो; पण तो ती चूक कबूलही करतो. अशा खूप चांगल्या गोष्टींचा विचार करून, मी ती भूमिका करत होतो. लोक शिव्या देत होते. सुरुवातीला मला थोडा त्रास व्हायचा; पण नंतर मला लक्षात आले की, ते प्रेम आहे.