केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट
नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित कागदपत्रे ‘पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालया’तून गहाळ झालेली नसून, ती सोनिया गांधी यांच्याकडे आहेत, असा खुलासा केंद्र सरकारने केला. काँग्रेसने या मुद्द्यावरून सरकारकडे माफीची मागणी केल्यानंतर, सांस्कृतिक मंत्रालयाने सोशल मीडियाद्वारे भूमिका स्पष्ट केली.
सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल २००८ रोजी सोनिया गांधींचे प्रतिनिधी एम. व्ही. राजन यांनी एक पत्र पाठवून नेहरूंची सर्व खासगी पत्रे आणि नोंदी परत देण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर, २००८ मध्ये नेहरूंच्या खासगी कागदपत्रांचे ५१ कार्टन्स सोनिया गांधी यांच्या स्वाधीन करण्यात आली होती.
मंत्रालयाने स्पष्ट केले की, हे कागदपत्रे परत मिळवण्यासाठी सोनिया गांधी यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे. २८ जानेवारी २०२५ आणि ३ जुलै २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रांचाही समावेश आहे. ‘नेहरूंची ही कागदपत्रे कुठे आहेत हे सरकारला ठाऊक आहे, त्यामुळे ती 'गहाळ' झाली आहेत असे म्हणणे चुकीचे आहे,’ असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 'एक्स'वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘नेहरूंची कागदपत्रे हा देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. ती कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता असू शकत नाही. ही कागदपत्रे सार्वजनिक संग्रहालयात असणे संशोधकांसाठी आवश्यक आहे. सोनिया गांधी नक्की काय लपवू पाहत आहेत? ही कागदपत्रे परत न करण्यासाठी दिलेली कारणे पटण्यासारखी नाहीत.’