बंगळुरू : घरात लहान मूल असताना क्षणभराचे दुर्लक्षही किती मोठी किंमत मोजायला लावू शकते, याचा हृदयद्रावक अनुभव असिस्टंट डायरेक्टर कीर्तन नाडगौडाला आला आहे. KGF २ मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलेले कीर्तन नादगौडा यांच्या साडेचार वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
कीर्तन नादगौडा यांचा मुलगा सोनार्श हा खेळता खेळता लिफ्टमध्ये गेला आणि त्याच दरम्यान तो लिफ्टमध्ये अडकला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नेमकं काय घडलं?
ही घटना सोमवारी, १५ डिसेंबर रोजी घडली. साडेचार वर्षांचा सोनार्श घरात खेळत असताना अचानक लिफ्टमध्ये गेला. काही क्षणांतच अपघात घडला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. अपघाताची तीव्रता इतकी होती की रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झाला. या घटनेने नादगौडा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कीर्तन नादगौडा यांनी KGF २ या गाजलेल्या चित्रपटात दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. सध्या ते ‘मैत्री मुव्ही मेकर्स’च्या एका मोठ्या आगामी प्रोजेक्टवर काम करत होते. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना आलेल्या या वैयक्तिक आघातामुळे तो पूर्णपणे हादरले आहेत. या दु:खद घटनेनंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.