नागपूर : गेल्या वर्षी १६ ऑक्टोबरपासून मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. यानुसार, सर्व व्यवहारांसाठी भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम किमान १०० वा २०० पासून थेट ५०० रुपये करण्यात आली. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवरदेखील झाला. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते.
प्रवेश घेताना, परीक्षा अर्ज भरताना किंवा इतर कोणत्याही प्रमाणपत्राची मागणी करताना विद्यार्थ्यांना ही स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे.