अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर पॅनल क्रमांक चार यांच्या कार्यालयावर गोळीबार झाला. ही मंगळवार आणि बुधवार दरम्यान मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले आहे. पोलीस तपास सुरू आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचं कार्यालय आहे. या कार्यालयावर गोळीबार झाला. गोळीबार करुन भाजपच्या उमेदवाराला आणि त्याच्या समर्थकांना घाबरवण्याचा हेतू असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून तीन - चार फैरी झाडल्या. आवाज ऐकून कार्यालयातले सुरक्षा रक्षक बाहेर आले त्यावेळी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार करत आलेले दोघे पळून गेले. गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. जीवितहानी झालेली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू केला आहे. स्थानिकांनी गोळीबार करणाऱ्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
फडणवीसांच्या भाषणाआधी गोळीबार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी संध्याकाळी अंबरनाथमध्ये एक सभा घेतील असे आधीच जाहीर झाले होते. ही सभा होण्याच्या आधी मध्यरात्री अंबरनाथमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्यामुळे या घटनेमागील राजकीय संदर्भ पोलीस तपासत आहेत.