हिंगोली: गांधी घराण्याचे निष्ठावंत दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. प्रज्ञा सातव यांचा १८ डिसेंबर रोजी भाजप प्रवेश होणार आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून प्रज्ञा यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गटबाजीला कंटाळून निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे आणि निष्ठावंत नेते होते. मात्र, कोरोना महामारीत अकाली निधनाने त्यांची राजकीय प्रवास कायमचा थांबला.
प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपने काँग्रेसला तगडा झटका दिला असल्याची चर्चा आहे. हिंगोलीच्या राजकारणात एकेकाळी मोठे नाव असलेले माजी खासदार दिवंगत राजीव सातव हे नाव उच्चारले की विरोधकांच्या माना झुकायच्या. गोड वाणी, सुसंघटित संगठन, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व या जोरावर राजीव सातव यांनी हिंगोलीला काँग्रेसचा अभेद्य किल्ला बनवला. पण कोविडने सातव यांना हिरावून नेले आणि त्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली.
कोण आहेत प्रज्ञा सातव?
डॉ. प्रज्ञा सातव या दिवगंत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे २०१४ ते २०१९ दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचे २०२१ मध्ये आजारपणामुळे निधन झाले. यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष असून सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर त्यांची बिनविरोध निवड झाली होती. प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या असून २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे.
कोण होते राजीव सातव?
राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. २०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश असल्याने ते प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले. सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.