दहा शहरांतील अभ्यासातून वास्तव उघड…
मुंबई : देशातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच अमली पदार्थांचे व्यसन सरासरी १३व्या वर्षीच सुरू होत असल्याची धक्कादायक माहिती एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. एम्स दिल्लीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासात भारतातील १० प्रमुख शहरांतील शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता.अभ्यासानुसार, इयत्ता ८,९,११ व १२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मोठ्या प्रमाणावर मुलांनी लहान वयातच व्यसनांचा अनुभव घेतल्याचे निदर्शनास आले. एकूण ५,९२० विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पदार्थांच्या वापराची सरासरी सुरुवातीची वयोमर्यादा १२.९ वर्षे असल्याचे नोंदले गेले.
विशेष म्हणजे, इंहेलंट्स (श्वसनाद्वारे घेतले जाणारे पदार्थ) वापरण्याचे वय सर्वात कमी असून ते सरासरी ११.३ वर्षे असल्याचे आढळले. त्यानंतर हेरॉइन (१२.३ वर्षे) आणि वैद्यकीय औषधांचा गैरवापर (१२.५ वर्षे) यांचा क्रम लागतो. तंबाखू आणि मद्यपान हे सर्वाधिक वापरले जाणारे पदार्थ असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी आयुष्यात कधी ना कधी व्यसनांचा वापर केल्याचे मान्य केले, तर १०.३ टक्के विद्यार्थ्यांनी मागील एका वर्षात आणि ७.२ टक्के विद्यार्थ्यांनी मागील महिन्यात अशा पदार्थांचा वापर केल्याचे सांगितले.
चिंतेची बाब म्हणजे, जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी तंबाखू सहज उपलब्ध असल्याचे, तर ३६ टक्के विद्यार्थ्यांनी मद्य सहज मिळत असल्याचे नमूद केले. यामुळे अल्पवयीन मुलांपर्यंत व्यसनाधीन पदार्थ सहज पोहोचत असल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे ९५ टक्के विद्यार्थ्यांना व्यसन हानिकारक असल्याची जाणीव असूनही त्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून आले. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये व्यसनांचे प्रमाण अधिक असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
अर्थात शहरी भागात मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात धुम्रपान व मद्यपानाची सवय असल्याचे दिसून आली आहे. गंभीर बाब म्हणजे शासनाने शाळांच्या शंभर मीटर परिसरात पान तंबाखूची दुकाने असू नयेत असे आदेश काढले असले तरी पोलिसांकडूनही याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.शालेय व महाविद्यालयीन परिसरात केवळ तंबाखूजन्य पदार्थच नव्हे तर अंमली पदार्थही उघडपणे मिळतात असे सूत्रांचे म्हणणे आहे. चरस-गांजापासून विविध अमली पदार्थ विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत असून मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाकडे वळताना दिसत आहे.
केवळ जनजागृती नव्हे तर पालक, शाळा, समाज आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय ही समस्या आटोक्यात येणार नाही असा इशाराही अभ्यासकांनी दिला आहे.