संख्येचे व्यवस्थापन करणारी प्रणाली महापालिकेकडून विकसित
मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील भटक्या श्वानांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने एआय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने भटक्या कुत्र्यांबाबतचा तपशील मिळू शकणार आहे. या प्रणालीचा वापर महापालिकेचे शेल्टरस, एनजीओ, पशु काळजीवाहक, पशु वैद्य इत्यादींना एकत्र जोडण्यासाठी व भटक्या कुत्र्यांची माहिती गोळा करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
मुंबईमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत असून गोरेगाव पश्चिम येथे एका भटक्या कुत्र्यांने आठ ते दहा जणांवर बिबट्या स्टाईलने हल्ला करत त्यांच्या तोंडाचे लगदे काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या हल्लेखोर भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी दोन दिवस पी दक्षिण विभागासह पशु वैद्यकीय विभागाचे पथक तळ ठोकून होते. भटक्या कुत्र्यांचीही नसबंदी करूनही त्यांची संख्या आणि त्यांचा उपदव्याप वाढत असला तरी प्राणीप्रेमी संस्थेपुढे कारवाई करण्यास महापालिका प्रशासन हतबल ठरत आहे. याच दृष्टीकोनातून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्यानंतरही ही संख्या वाढत असल्याने या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीकोनातून महापालिकेने एक ए आय तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने या प्रणालीद्वारे १० हजार भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ महिन्यांच्या कालावधीसाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार असून पुढील तीन वर्षांची देखभाल करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ही प्रणाली स्टार्टअप मार्फत तयार केलेली आहे. यासाठी इंडिकेअर एआय सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्माईल कौन्सिल बिझनेस इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून तयार होणारी विविध उत्पादने, सेवा व सुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठी निविदा न मागवता प्रायोगिक तत्वावर खरेदी व वापरात आणण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. स्माईल कौन्सिलच्या या तुकडीमध्ये इंडिकेअर एआय सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या इक्युवेटीचा सामावेश करण्यात आला आहे. या नवउदमीं इंडीकेअर एआय सोल्यूशन्य प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भटक्या श्वानांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यासाठी एआय तंत्रज्ञान प्रणाली विकसित केलेली आहे.