मंत्री आशिष शेलार यांचे आव्हान; मुंबईत विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका
मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या पाच टर्ममध्ये सत्ताधारी असताना खर्च झालेल्या सव्वा लाख कोटी रुपयांचा मुंबईकरांना हिशेब द्या, मुंबईकरांनवर खर्च केले किती आणि खिशात गेले किती? असा थेट सवाल सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी उबाठाला केला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटोपून रविवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच पालकमंत्री आशिष शेलार यांनी विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनांचा धडाका सुरू केला. सकाळी ९.३० वाजता राजावाडी येथील सेठ व्ही. सी. गांधी व एम. ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करून त्यांच्या आजच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली.
यानंतर वांद्रे पश्चिम मतदारसंघातील स्वामी विवेकानंद सरोवराच्या स्वच्छता व पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे सरोवराला नवसंजीवनी मिळणार असून नैसर्गिक परिसंस्थेचे पुनर्स्थापन होणार आहे. तसेच खारदांडा येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत क्लोरीनलेस वॉटर प्युरीफायर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेत स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच वांद्रे पश्चिम मतदारसंघातील तब्बल २३ विविध ठिकाणच्या शेड दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, ड्रेनेज व पॅसेजच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
वाहतूक कोंडी कमी होणार
हॉटेल रंगशारदा येथून थेट पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच वांद्रे-वर्ली सी-लिंकला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रॅम्पच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या रॅम्पमुळे लीलावती रुग्णालय परिसरातील तसेच संपूर्ण वांद्रे पश्चिम भागातील दीर्घकाळापासून सुरू असलेली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. लीलावती रुग्णालय परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गेली अनेक वर्षे आशिष शेलार यांनी सातत्याने प्रयत्न करून हा रस्त्याचे काम आता सुरु करण्यात आले आहे. याशिवाय मालाड येथील कुरार व्हिलेज परिसरात भारतरत्न बिस्मिल्लाह खान उद्यानापासून त्रिवेणी नगर रोड आणि जी. जी. महालकरी रोड (डी. पी. रोड) या रस्त्यांचे लोकार्पण पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व विकासकामांमधून मुंबईकरांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, पर्यावरण व पायाभूत सोयीसुविधा अधिक सक्षम करण्याचा आमचा निर्धार आहे, असे पालकमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.